Join us

'तू हैं मेरा संडे' सिनेमाच्या टीमची लोकमतच्या ऑफिसला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 15:30 IST

'तू हैं मेरा संडे' हा सिनेमा नुकताच रसिकांच्या भेटीला आला आहे. मुंबईतील मध्यम आणि उच्च-मध्यम वर्गीय नागरिकांचं जीवन दाखवणारा ...

'तू हैं मेरा संडे' हा सिनेमा नुकताच रसिकांच्या भेटीला आला आहे. मुंबईतील मध्यम आणि उच्च-मध्यम वर्गीय नागरिकांचं जीवन दाखवणारा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रसिकांचं मनोरंजन करत आहे. नुकतंच या सिनेमाच्या टीमनं लोकमतच्या ऑफिसला भेट दिली. यावेळी सिनेमातील अभिनेता बरुण सोबती, अभिनेत्री सुहाना गोस्वामी, अभिनेता विशाल मल्होत्रा आणि मानवी गार्गू उपस्थित होते. या सिनेमाचं शीर्षक थोडं हटके आणि तितकंच आकर्षक असं आहे. सिनेमाचं शीर्षक रोमँटिक असून त्याद्वारे मांडलेला विचारही तितकाच रोमँटिक असल्याचे सिनेमाच्या टीमने सांगितले. सिनेमातील प्रत्येक व्यक्ती ज्याचा त्याचा संडे शोधण्याचा प्रयत्न करत असतो असंही सिनेमाच्या टीमनं सांगितले. या सिनेमात अभिनेता बरुण सोबती याची खास भूमिका आहे. सिनेमाला समीक्षक आणि रसिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून बरुणही भारावला आहे. रसिकांच्या प्रतिक्रिया वाचून  आनंद झाल्याचं बरुणनं सांगितले. तसंच रसिकांची मागणी पाहता हा सिनेमा इतर भाषांमध्ये डब करण्यात येणार असल्याची माहिती त्याने दिली. सध्या जर्मन, अरबी, डच आणि पोर्तुगीज या भाषांमध्ये या सिनेमाचं डबिंग होणार आहे. तसंच आणखी काही इतर भाषांमध्येही सिनेमाची डबिंग झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका असंही त्याने म्हटलं आहे. अभिनयासह बरुणला फुटबॉल खेळायलाही आवडतं. वेळ मिळेल तेव्हा तो फुटबॉल खेळण्याची आवड पूर्ण करतो असंही बरुणनं यावेळी सांगितलं. फुटबॉलसह क्रिकेटही आवडत असल्याचं सांगायलाही तो विसरला नाही. 'हिप हिप हुर्रे' मालिकेतून प्रसिद्ध अभिनेता विशाल मल्होत्रा याचीही या सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे. विशालने सिनेमातील गंमतीजमतीसह शूटिंगच्या वेळचा किस्सा सांगितला. सिनेमाच्या तयारीसाठी सकाळी 6 वाजता उठून जुहू बीचवर महिनाभर फुटबॉलचा सराव केल्याची आठवण विशालने यावेळी सांगितली. अभिनेत्री शाहना हिनंही या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. शाहना हिने काव्या रंगनाथन उर्फ कवी ही भूमिका साकारली आहे. कवी एक मॉर्डन आणि करियरमध्ये यशस्वी तरुणी आहे. मात्र अलझायमर या आजाराने त्रस्त वडिलांची जबाबदारीही तिच्यावर आहे. त्यामुळे या जबाबदा-या निभावताना तिचं वैयक्तीक जीवन ती विसरुन गेली आहे अशी व्यक्तीरेखा साकारल्याचे शाहनानं सांगितलं. शाहना ही परदेशात काम करते. मात्र या सिनेमाच्या निमित्ताने तिचं हिंदी सिनेमात कमबॅक झालंय. भारतात येऊन हिंदी सिनेमात काम करणं स्पेशल असतं असंही तिने सांगितले. याआधी हिंदी सिनेमात लेखक आणि कथेला इतकं महत्त्व दिलं जात नव्हतं. मात्र आता तो काळ मागे पडला असून चित्र बदलत असल्याचे तिने सांगितले. या सिनेमात अभिनेत्री मानवी गार्गू हिचीही भूमिका आहे. या सिनेमातील गाणी रसिकांना भावतायत. त्यापैकी 'थोडी सी जगह' आणि 'ये मेरा मन' ही आपली आवडती गाणी असल्याचे तिने सांगितले. 'संडे' म्हणजे कधीही दोष-विरहित जीवन जगा... बिनधास्त जगा असंही तिनं म्हटलंय.