Join us

१० वर्षांच्या लेकीला मीडियापासून का दूर ठेवलंय? राणी मुखर्जीने दिलं असं उत्तर की, सर्वांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 16:14 IST

१० वर्षांची झाली राणी मुखर्जीची लेक. आजवर कधीच लेकीला मीडियासमोर का आणलं नाही, या प्रश्नावर राणीने दिलेलं उत्तर सर्वांचं मन जिंकून गेलंय

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) नेहमीच तिची मुलगी आदिरा (Adira) हिला माध्यमांपासून आणि सार्वजनिक ठिकाणांपासून दूर ठेवते. आता नुकत्याच एका मुलाखतीत राणीने यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. राणी आणि आदिरा या मायलेकींचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. परंतु तरीही राणीने आदिराला आजवर कधीच मीडियासमोर आणलं नाही. अखेर राणीने यामागच्या खास कारणाचा खुलासा केला त्यामुळे सर्वांनी तिचं कौतुक केलं.

म्हणून लेकीला बाहेर आणत नाही राणी

ANI ला दिलेल्या मुलाखतीत राणीने सांगितलं की, आदिराला जास्त प्रसिद्धी मिळावी, अशी तिची आणि तिचा पती आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांची अजिबात इच्छा नाही. राणी म्हणाली, "आम्ही दोघांनीही आमच्या मुलीबद्दल एकच विचार केला आहे. तिला कधीही अनावश्यक प्रसिद्धी मिळू नये, ज्यामुळे तिला असं वाटेल की ती खास आहे."

मुलीच्या भविष्याबद्दल बोलताना राणीने स्पष्ट केलं की, "जेव्हा ती मोठी होईल आणि आपल्या आवडीचे करिअर निवडेल, तेव्हा तिला जी काही ओळख मिळेल, ती तिची योग्यता आणि क्षमतेमुळे मिळावी. ती ओळख तिला तिच्या आई-वडिलांच्या प्रसिद्धीमुळे मिळू नये. तिने ती स्वतः कमावली पाहिजे. सहज मिळालेल्या ओळखीचं महत्व राहत नाही."

राणीने सांगितलं की, आदिरा खाजगी आयुष्य जगण्याच्या बाबतीत तिच्या वडिलांना (आदित्य चोप्रा) फॉलो करते. तिची याविषयी खूप ठाम मतं आहेत. यावेळी राणीने मातृत्व आणि काम याचा समतोल साधण्याबद्दलही सांगितले. "मी जेव्हा 'हिचकी' चित्रपटाचे शूटिंग करत होते, तेव्हा आदिरा अवघ्या १४ महिन्यांची होती आणि मी तिला स्तनपान करत होते.'' आदिराचा जन्म ९ डिसेंबर २०१५ रोजी झाला असून, ती आता १० वर्षांची आहे. राणी आणि आदित्य चोप्रा यांनी आदिराला लोकांच्या नजरेपासून दूर ठेवत एक सामान्य बालपण देण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :राणी मुखर्जीआदित्य चोप्रा मदर्स डेप्रेग्नंसीगर्भवती महिला