Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहेत सेन्सॉरचे नवे अध्यक्ष प्रसून जोशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 21:20 IST

सीबीएफसीचे वादग्रस्त आणि संस्कारी अध्यक्ष म्हणून ओळखले गेलेले पहलाज निहलानी यांची अखेर या पदावरून गच्छंती करण्यात आली आहे. आता ...

सीबीएफसीचे वादग्रस्त आणि संस्कारी अध्यक्ष म्हणून ओळखले गेलेले पहलाज निहलानी यांची अखेर या पदावरून गच्छंती करण्यात आली आहे. आता या पदाचे सूत्र प्रसिद्ध गीतकार तथा लेखक प्रसून जोशी यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. दरम्यान, प्रसून जोशी हे मोदी सरकारचे अतिशय जवळचे समजले जातात. ते एक चांगले हिंदी कवी, लेखक, पटकथा लेखक आहेत. जाहिरात जगतातही त्यांनी एक वेगळा ठसा उमटविला आहे. आंतरराष्ट्रीय जाहिरात कंपनी ‘मॅकऐन इरिक्सन’चे ते कार्यकारी अध्यक्ष राहिले आहेत. प्रसून जोशी यांचा जन्म १५ सप्टेंबर १९६८ मध्ये उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील दन्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रकुमार जोशी आणि आईचे नाव सुषमा जोशी आहे. त्यांचे बालपण तथा शिक्षण टिहरी, गोपेश्वर, रूद्रप्रयान, चमोली आणि नरेंद्रनगर या भागात झाले. त्यांनी एमएसी आणि नंतर एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. प्रसून जोशी यांनी ‘मौला, कैसे मुझे तू मिल गई, तू बिन बताए, खलबली है खलबली, सांसों को सांसों’ यासारखे सुपरहिट गाणी लिहिली आहेत. राजकुमार संतोषी यांच्या ‘लज्जा’ या चित्रपटातून त्यांनी इंडस्ट्रीत एंट्री केली. प्रसून जोशी यांना दोन वेळा सर्वोत्कृष्ट गीतकार या श्रेणीत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार त्यांना ‘तारे जमीन पर’ आणि ‘चिटगॉन्ग’ या चित्रपटातील गाण्यांसाठी दिला गेला. २०१५ मध्ये त्यांना कला, साहित्य आणि जाहिरात या क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल पद्मश्री या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.आतापर्यंत त्यांचे तीन पुस्तकेही प्रकाशित झाले आहेत. त्याचबरोबर ‘दिल्ली-६, तारे जमीन पर, रंग दे बसंती, हम-तूम आणि फना यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट गाणी लिहिली आहेत. त्याचबरोबर ’ठण्डा मतलब कोकाकोला आणि बार्बर शॉप मे जा बाल कटा ला’ यांसारख्या प्रसिद्ध जाहिरातींची निर्मिती केली आहे. आता त्यांच्याकडे सेन्सॉरची धुरा सोपविण्यात आल्याने त्यांच्याकडून चांगल्या निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.