जेव्हा 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर श्रीदेवीने धरला होता या मराठी गाण्यावर ताल,त्यावेळी असा होता त्यांचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 10:02 IST
श्रीदेवी. 'सदमा', 'चांदनी'मधील संवेदनशील भूमिका असो की 'चालबाज'मधील बिनधास्त भूमिका या तेवढ्याच सक्षमपणे सांभाळणारी अभिनेत्री अशी तिची ओळख. लग्नानंतर ...
जेव्हा 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर श्रीदेवीने धरला होता या मराठी गाण्यावर ताल,त्यावेळी असा होता त्यांचा अंदाज
श्रीदेवी. 'सदमा', 'चांदनी'मधील संवेदनशील भूमिका असो की 'चालबाज'मधील बिनधास्त भूमिका या तेवढ्याच सक्षमपणे सांभाळणारी अभिनेत्री अशी तिची ओळख. लग्नानंतर काही काळ अभिनयापासून दुर गेलेल्या श्रीदेवीने दोन वर्षांपूर्वी आलेल्या 'इंग्लीश विंग्लीश' चित्रपटातून सिनेसृष्टीत पुनरागमन केलं आणि त्यानंतर 'मॉम' या चित्रपटातून ती परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने श्रीदेवी 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर आली होती.यावेळी थुकरटवाडीच्या मंडळीने सादर केलेल्या 'नागिन' चित्रपटाच्या स्किटवर श्रीदेवीने खळखळून हसत दाद दिली.याशिवाय 'इंग्लीश विंग्लीश' सारखा मराठी बिराठीचा क्लासही या मंचावर भरविण्यात आला आणि त्यानेही उपस्थितांना खळखळून हसविले. यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकीचा मराठीचा आगळा वेगळा वर्ग घेण्यात आला ज्यात त्यानेही धम्माल उडवून दिली. याशिवाय पोस्टमन काकाने एका पत्रातून एका मुलीच्या आपल्या आईप्रतीच्या भावना वाचून दाखवल्या आणि ते ऐकून श्रीदेवीही हळवी झाली.एका मराठी कार्यक्रमाच्या शोमध्ये श्रीदेवी मराठी पेहरावात दिसल्या. श्रीदेवी यांना छोट्या पडद्यावर पाहून तिला पुन्हा रूपेरी पडद्यावर पाहताच रसिकांनाही त्यांची चांदनी आठवली. घायाळ करणारे श्रीदेवीचे नयना.... दिलखेचक अदा... आणि बेधुंद करणार डान्स... अनेक सिनेमातून श्रीदेवी सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले.त्या 54 वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.आज दुपारी दोन वाजता त्यांना मुंबईत आणले जाणार असल्याची माहिती मिळते.