Join us

जेव्हा ‘बेटी’च्या तालावर आमीर खान ठुमके लावतो तेव्हा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 21:09 IST

अभिनेता आमीर खान याचा सुपरहिट सिनेमा ‘दंगल’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी सिनेमातील आमीरची ‘बेटी’ सान्या मल्होत्रा ही डान्समध्येही एक्सपर्ट आहे. ...

अभिनेता आमीर खान याचा सुपरहिट सिनेमा ‘दंगल’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी सिनेमातील आमीरची ‘बेटी’ सान्या मल्होत्रा ही डान्समध्येही एक्सपर्ट आहे. सिनेमात महावीर सिंग फोगाट यांची मुलगी बबिता फोगाटची भूमिका साकारणारी सान्या आमीरच्या होम प्रॉडक्शनमध्ये बनत असलेल्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या सिनेमात त्याला आपल्या तालावर नाचवताना बघावयास मिळणार आहे. आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. त्याचे झाले असे की, सिनेमाचे दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनी सिनेमात आमीरवर चित्रित करण्यात येत असलेल्या एका गाण्याला कोरिओग्राफ करण्याची जबाबदारी सान्यावर सोपविली आहे. सान्यानेदेखील अद्वैत चंदन यांची ही आॅफर लगेचच स्वीकारत आमीरसाठी काही डान्स स्टेप्सही तयार केल्या. सान्याने तयार केलेल्या या स्टेप्स निश्चितच सोप्या नव्हत्या. आमीरला या स्टेप्स करताना अडचणी येतील असेच बोलले जात होते. परंतु बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट अशी बिरुदावली मिळालेल्या आमीरने या स्टेप्स सहज आणि चांगल्या पद्धतीने करून दाखविल्या. याविषयी सान्याने एका न्यूज एजन्सीशी बोलताना सांगितले की, मला डान्स आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट खूप आवडते. जेव्हा अद्वैतने मला आमीरच्या कोरिओग्राफीसाठी विचारले तेव्हा मी दंग राहिली. कारण मी स्वप्नातदेखील असा विचार केला नव्हता की, मला एवढी मोठी संधी मिळेल. आमीर खानसोबत आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी सान्या मल्होत्रा सध्या आमीरसोबत इंटर्नशिप करत आहे. त्यामुळेच तिच्यावर ‘सिक्रेट सुपरस्टार’ या सिनेमाशी संबंधित महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. आता सान्या थेट आमीरसोबतच अभिनयाचे धडे घेत असल्याने तिचे फिल्मी करिअर उज्ज्वल म्हटले तर घाईचे ठरू नये.