काय आहे अक्षय कुमारचे रोजचे वेळापत्रक... जाणून घ्या आमच्यासोबत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 17:00 IST
अक्षय कुमार हा खऱ्या आयुष्यातही खिलाडी असल्याचे त्याने अनेकवेळा सिद्ध केले आहे. बॉलिवूडमधील सगळेच दिग्गज कलाकार वर्षाला केवळ एक-दोन ...
काय आहे अक्षय कुमारचे रोजचे वेळापत्रक... जाणून घ्या आमच्यासोबत...
अक्षय कुमार हा खऱ्या आयुष्यातही खिलाडी असल्याचे त्याने अनेकवेळा सिद्ध केले आहे. बॉलिवूडमधील सगळेच दिग्गज कलाकार वर्षाला केवळ एक-दोन चित्रपट करत असले तरी हा खिलाडी वर्षाला तीन-चार चित्रपट करतो आणि त्याचे सगळेच चित्रपट हे सुपरहिट होतात. अक्षय वर्षाला इतके चित्रपट कसा करू शकतो याचे गुपित नुकतेच त्याने शेअर केले आहे...अक्षय कुमार प्रत्येक वर्षांला कमीतकमी तीन-चार चित्रपटांमध्ये काम करतो. त्याने 2017च्या सुरुवातीलाच चार चित्रपटांची घोषणा केली आहे. यावर्षात अक्षयचे जॉनी एलएलबी 2, टॉयलेट-एक प्रेम कथा, टू पॉईंट झिरो आणि पॅडमॅन असे चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चारही चित्रपटांमधील त्याच्या भूमिका या खूपच वेगवेगळ्या आहेत. अक्षय वर्षभरात चार चित्रपट कशाप्रकारे करू शकतो हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. बॉलिवूडमधील सगळे दिग्गज कलाकार वर्षातून एक-दोनच चित्रपट करतात. पण अक्षय या सगळ्यांपेक्षा खूपच वेगळा आहे. वर्षभर कशाप्रकारे काम करायचे याचे टाइमटेबल तो वर्षाच्या सुरुवातीलाच आखतो. या वर्षाचे टाइमटेबलदेखील त्याने तयार केले आहे. त्यानेच हे गुपित मीडियासमोर उघड केले आहे. अक्षय हा अतिशय शिस्तप्रिय आहे. तो कधीही रात्रीच्या पार्टींना जात नाही. तसेच तो रोज भल्या पहाटे उठतो. त्याने त्याच्या वेळापत्रकाबद्दल एका मुलाखतीत सांगितले आहे. अक्षय वर्षातून चार चित्रपट करत असल्याने वर्षातील 60 दिवस प्रत्येक चित्रपटाला देणार आहे. त्यानुसार तो वर्षातील 240 दिवस चित्रपटांच्या चित्रीकरणाला देणार आहे. इतके दिवस चित्रीकरण करूनही त्याच्याकडे 125 दिवस शिल्लक राहाणार आहेत. अक्षय हा संपूर्ण फॅमिली मॅन असल्याने तो जास्तीत जास्त वेळ त्याच्या पत्नीला म्हणजेच ट्विंकल खन्ना आणि त्याच्या मुलांना देतो. त्यामुळे मुलांच्या सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी तो कोणतेही काम करत नाही. तो संपूर्ण दिवस त्यांच्यासोबतच घालवतो. त्यामुळे दर रविवारी यानुसार वर्षातील 52 दिवस तो चित्रीकरण करत नाही. तो प्रत्येक चित्रपटाचे चित्रीकरण केल्यानंतर एका आठवड्याचा ब्रेक घेतो. म्हणजे तीन चित्रपटांनंतर तो 21 दिवसांची सुट्टी घेतो. तसेच वर्षातील एकूण 45 दिवस तो मुलांसोबत आणि ट्विंकलसोबत हॉलिडेवर जातो. याचा अर्थ तो वर्षातील 118 दिवस काम करत नाही. यानुसार अक्षय 240 दिवस काम करतो तर 118 दिवस सुट्टी घेतो. दोन्ही मिळून 358 दिवस होतात. उरलेले सात दिवस तो जाहिरातींना देतो. अक्षय त्याने त्याचे आखलेले वेळापत्रक अगदी व्यवस्थितरित्या पाळतो. घडाळ्याच्या काट्याप्रमाणे तो चालत असतो. त्याची सकाळ पहाटे चार वाजता सुरू होते तर रात्री तो लवकर झोपतो. तो कोणत्याही फिल्मी पार्टींना जात नाही. आपल्या आयुष्यातील प्रत्येक मिनिट हा महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक मिनिटाचा सदुपयोग केला पाहिजे असे त्याचे म्हणणे आहे. या सगळ्यामुळेच त्याला इतके चित्रपट करणे शक्य होत आहे.