दिव्या दत्ताने आज बॉलिवुडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने सुरक्षा या चित्रपटापासून 1995च्या सुमारास तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात तिने अनेक चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम केले. पण एक अभिनेत्री म्हणून तिला प्रस्थ निर्माण करता आले नाही. तिच्या कोणत्याच भूमिका गाजल्या नाहीत. तसेच नंतरच्या काळात तिला चांगल्या भूमिकाही मिळाल्या नाहीत. पण गेल्या 10-15 वर्षांत ती खूपच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत आहे. ती अभिनेत्री नव्हे तर सहाय्यक अभिनेत्री म्हणून अनेक चित्रपटात झळकत आहे. सहाय्यक अभिनेत्री म्हणून तिच्या वाट्याला सध्या खूप चांगल्या भूमिका येत आहेत. भाग मिल्खा भाग, देल्ही 6 या चित्रपटात तिने आपल्या अभिनयाची चुणूकदेखील दाखवली आहे. सध्या तिच्या भूमिकांचे कौतुक प्रेक्षक आणि समीक्षक दोघेही करत आहेत. तिला तिच्या भूमिकांसाठी अनेक पुरस्कारही मिळालेत. ती चित्रपटात झळकण्यासोबतच सावधान इंडिया या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही करत आहे आणि आता ती हॉलिवूडच्या एका चित्रपटात झळकणार आहे. तिने हॉलिवूड चित्रपट साईन करून कित्येक महिने झाले असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला या वर्षाच्या अखेरीपर्यंत ती सुरुवात करणार आहे. हॉलिवूडमध्ये काम करण्यास ती खूप उत्सुक असल्याचे कळतेय.
हम चले हॉलिवूड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 11:35 IST