बॉलिवूडच्या ‘या’ स्टार जोड्यांची प्रेक्षकांना प्रतीक्षा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 17:30 IST
अबोली कुलकर्णीफिल्मी पडद्यावर नवं काहीतरी बघायला आपण सगळेच नेहमी उत्सुक असतो. तीच ती थीम, तोच तो विषय कुणालाच ...
बॉलिवूडच्या ‘या’ स्टार जोड्यांची प्रेक्षकांना प्रतीक्षा !
अबोली कुलकर्णीफिल्मी पडद्यावर नवं काहीतरी बघायला आपण सगळेच नेहमी उत्सुक असतो. तीच ती थीम, तोच तो विषय कुणालाच आवडत नाही. इतकंच काय तर, सतत एकच जोडी आपल्याला जर पाहायला मिळत असेल तर आपल्याला नकोसं होतं. यासाठी निर्माता, दिग्दर्शक पडद्यावर प्रेक्षकांना फ्रेशनेस मिळवून देण्यासाठी काही नव्या जोड्यांना एकत्र आणतात. आता उदाहरणच द्यायचे झालं तर, ‘वेक अप सिड’ मध्ये रणबीर कपूर-कोंकणा सेन, ‘पिकू’ मध्ये दीपिका पादुकोण-इरफान पठाण, ‘डिअर जिंदगी’मध्ये शाहरूख खान-आलिया भट्ट यांना दिग्दर्शकांनी एकत्र आणलं. अशा बऱ्याच जोडयांवर प्रेक्षकांनी तुफान प्रेम केलं. आजही बॉलिवूडमध्ये अशा अनेक स्टार्सच्या जोड्या आहेत ज्यांनी आॅनस्क्रीन एकत्र यावं अशी चाहत्यांचीच इच्छा आहे. चला तर मग पाहूयात, असे कोणकोणते कलाकार आहेत जे आॅनस्क्रीन आपल्याला एकत्र पाहायला खूप आवडतील... शाहरूख खान आणि कंगना राणौतशाहरूख खान आणि संजय लीला भन्साळी हे १५ वर्षांपूर्वी ‘देवदास’ या चित्रपटासाठी एकत्र आले होते. आता पुन्हा ‘बी टाऊन’मध्ये अशी चर्चा सुरू झाली की, हे दोघे एकत्र येणार आहेत. पण, होय शाहरूख हा कंगनासोबत एका चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. ‘जब हॅरी मेट सेजल’ नंतर शाहरूखला ही चर्चा कळाली. तेव्हा त्याने मीडियाला सांगितले की, ‘मला कंगनासोबत काम करायला आवडेल. ती एक चांगली अभिनेत्री आहे.’ सलमान खान आणि दीपिका पादुकोणबॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि डिम्पल क्वीन दीपिका पादुकोण हे आत्तापर्यंत आॅनस्क्रीन एकत्र आलेले नाहीत. मात्र, त्यांना पडद्यावर रोमान्स करताना पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. बॉलिवूड वर्तुळात चर्चा होती की, ते दोघे ‘शुद्धी’ आणि संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात ते दिसणार आहेत. मात्र, या केवळ चर्चा आहेत, यात तथ्य नाही. श्रद्धा कपूर आणि रणवीर सिंग‘हसीना पारकर’ या चित्रपटामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सध्या चर्चेत आहे. तिने हसीना पारकर यांची व्यक्तीरेखा उत्कृष्टरित्या साकारली आहे. तसेच रणवीर सिंग सध्या ‘पद्मावती’ चित्रपटासाठी चर्चेत असून त्याला निवडक चित्रपट उत्कृष्टरित्या करणारा अभिनेता म्हणून ओळखलं जातं. मात्र, हे दोघे कलाकार अद्याप एकत्र आलेले नाहीत. नक्कीच त्यांना एकत्र आलेलं पाहायला आपल्याला आवडेल.वरूण धवन आणि परिणीती चोप्रा‘ढिशूम’ चित्रपटात वरूण धवन आणि परिणीती चोप्रा यांना एकत्र आलेलं आपण पाहिलं. मात्र, ते केवळ एका गाण्यासाठी. या चित्रपटातील ‘जानेमन आह’ हे गाणं खुप हिट ठरलं. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली पण, त्यांना केवळ एकाच गाण्यावर समाधान मानावं लागलं. त्यांना एक कपल म्हणून पडद्यावर पाहायला आपल्याला नक्कीच आवडेल. हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण तो हॉट! ती सेक्सी! ते दोघे एकत्र आले तर सिल्व्हर स्क्रिनवर ब्लास्ट करतील, हे नक्की. पण, तुम्हाला माहितीये का, हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण हे आत्तापर्यंत सिल्व्हर स्क्रिनवर एकत्र आलेले नाहीत. चर्चा अशीही होती की, ते दोघे लवकरच एका चित्रपटात एकत्र येणार आहेत. मात्र, अद्याप यात काही तथ्य नाही. कबीर खानच्या आगामी चित्रपटात कॅटरिना कैफ आणि दीपिका पादुकोण या दिसणार आहेत अशी चर्चा रंगली होती. पण, सध्यातरी ती केवळ चर्चाच आहे, असे म्हणावे लागेल.