विवेक ओबेरॉय हा बॉलिवूडमधला लोकप्रिय अभिनेता. सध्या विवेक बॉलिवूडमध्ये तितका सक्रिय नसला तरी अजूनही चाहत्यांच्या मनात त्याच्यासाठी तितकंच प्रेम आहे. त्याचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले. अशाच एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान विवेकसोबत धक्कादायक घटना घडली. शूटिंग संपल्यावर रात्रीचा प्रवास करत असताना अभिनेत्याच्या गाडीचा भयानक अपघात झाला होता. या अपघातातून अभिनेता थोडक्यात बचावला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विवेक ओबेरॉयने अंगावर काटा आणणारा हा प्रसंग सांगितला.
विवेकने नुकतीच मॅशेबल इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने रोड सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक प्रसंग सांगितला. तो म्हणाला, "राजस्थानमध्ये रोड सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. बिकानेरहून आम्ही जैसलमेरला जात होतो. तेव्हा रात्रीची वेळ होती. सुंदर रस्ते आणि वातावरणही सुंदर होतं. पण समोरचं दिसत नव्हतं म्हणून मी ड्रायव्हरला गाडी थोडी हळू चालवण्यास सांगितलं होतं. मला आठवतंय जवळपास १५-२० वेळा मी ड्रायव्हरला हे सांगितलं. मी त्याच्या बाजूलाच पुढच्या सीटवर बसलो होतो".
"तेव्हाच जोरात आवाज आला. रस्त्यावर एक उंच गाडी आली ज्यामध्ये लोखंडाच्या सळ्या होत्या. त्या सळ्या विंडशील्डच्या आरपार घुसल्या होत्या. जर माझी सीट सरळ असती तर त्या सळ्या थेट माझ्या डोक्यात घुसल्या असत्या. मी त्या गाडीतून बाहेर निघू शकत नव्हतो कारण सळ्या माझ्यावर होत्या. सुदैवाने मला कोणतीही दुखापत झाली नाही. पण, या अपघतात थोडक्यात वाचलो होतो. यानंतर मी कधीच पुढच्या सीटवर बसलो नाही", असंही विवेकने सांगितलं.
विवेक ओबेरॉयचा 'रोड' हा सिनेमा २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात त्याने अरविंद चौहान ही भूमिका साकारली होती. या अपघातानंतर विवेक ओबेरॉयने रात्री प्रवास न करण्याचा निर्णय घेतला.