Join us  

शशी थरूर यांनी उडवली ‘The Kashmir Files’ची खिल्ली, भडकले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 2:17 PM

Vivek Agnihotri, Shashi Tharoor Twitter War : ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा सिंगापूरमध्ये बॅन झाल्याची बातमी आली आणि हे ‘वॉर’ सुरु झालं.

Vivek Agnihotri, Shashi Tharoor Twitter War :   ‘द काश्मीर फाइल्स’  ( The Kashmir Files) या चित्रपटावरून सुरू असलेलं ‘राजकारण’ अद्यापही सुरू आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा (Vivek Agnihotri) हा सिनेमा रिलीज झाला तेव्हापासूनच चर्चेत आहे. काहींच्या मते, हा सिनेमा काल्पनिक आहे तर काहींच्या मते, प्रोपोगंडा. आता पुन्हा ‘द काश्मीर फाइल्स’च्या निमित्ताने ट्विटरवर ‘वॉर’ रंगलं आहे. ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor ) यांच्यात नवा वाद सुरू झाला आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा सिंगापूरमध्ये बॅन झाल्याची बातमी आली आणि हे ‘वॉर’ सुरु झालं. ‘द काश्मीर फाइल्स’ प्रक्षोभक असल्याचं कारण देत सिंगापूरमध्ये हा सिनेमा बॅन करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सिंगापूरच्या ‘न्यूज एशिया’ चॅनलची यासंदर्भातील लेख शेअर करत शशी थरूर यांनी एक ट्विट केलं. ‘भारतातील सत्ताधारी पक्षानं प्रमोट केलेला चित्रपट द काश्मीर फाइल्स सिंगापूरमध्ये बॅन करण्यात आला आहे,’अशा आशयाचं ट्विट थरूर यांनी शेअर केलं. शशी थरूर यांचं हे ट्विट पाहून विवेक अग्निहोत्री भडकले.

शशी थरूर यांना अग्निहोत्रींनी असं दिलं उत्तर

शशी थरूर यांच्या ट्विटला विवेक अग्निहोत्रींना लगेच उत्तर दिलं. ‘प्रिय Fopdoodle (मूर्ख) Gnashnab (कायम तक्रार करणारा), सिंगापूर जगातील सर्वात मागास सेंसर आहे. त्यांनी तर The Last Temptations of Jesus Christ या चित्रपटालाही बॅन केलं होतं. इतकंच नाही तर The Leela Hotel Files हा रोमॅन्टिक सिनेमा सुद्धा बॅन केला होता. कृपा करून काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची खिल्ली उडवणं बंद करा...,’अशा शब्दांत अग्निहोत्रींनी थरूर यांना उत्तर दिलं. आपल्या ट्विटसोबत त्यांनी सिंगापूरनं बॅन केलेल्या 48 लोकप्रिय चित्रपटांची यादीही जोडली. यापैकी काही सिनेमांना IMDb वर 8 रेटींग मिळालेलं आहे.इतकं करून अग्निहोत्री थांबले नाहीत तर त्यांनी आणखी दुसरं ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी शशी थरूर यांची दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांचा उल्लेख केला.

सुनंदा पुष्करच्या आत्म्याची माफी मागावी...

‘सुनंदा पुष्कर या काश्मिरी हिंदू होत्या काय हे सत्य आहे? सोबत जोडलेला स्क्रिनशॉट काय खरा आहे? खरा असेल तर हिंदू परंपरेनुसार, एका मृत आत्म्याचा आदर करत तुम्हाला तुमचं ट्विट डिलीट करायला हवं शिवाय त्यांच्या आत्म्याची माफी मागायला हवी,’असं दुसरं ट्विट अग्निहोत्रींनी केलं.

या ट्विटसोबत अग्निहोत्रींनी सुनंदा पुष्कर यांच्या एका जुन्या ट्विटचा स्क्रिनशॉट जोडला आहे. यात सुनंदा यांनी त्या काश्मीरी असल्याचं म्हटलं आहे. 1989-91मध्ये झालेल्या काश्मिरी हिंसाचारावर आपल्या पतीमुळे आपल्याला ठोस भूमिका घेता आली नाही, असं सुनंदा यांनी त्यांच्या या जुन्या ट्विटमध्ये लिहिलेलं आहे.

टॅग्स :द काश्मीर फाइल्सशशी थरूरविवेक रंजन अग्निहोत्री