Join us  

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 2:02 PM

रजनिगंधा, छोटी छोटी बात, पती पत्नी और वो यांसारखे उत्कृष्ट चित्रपट बॉलिवूडला दिलेल्या अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे आज निधन झाले.

ठळक मुद्देविद्या यांनी काही वर्षांपूर्वी सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात कमबॅक केला.

रजनिगंधा, छोटी छोटी बात, पती पत्नी और वो यांसारखे उत्कृष्ट चित्रपट बॉलिवूडला दिलेल्या अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे आज निधन झाले. त्यांना मुंबईतील जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. रुग्णालयात दाखल केल्यानंतरही त्यांची प्रकृती ढासळत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

विद्या यांना रुग्णालयात गत बुधवारी दाखल करण्यात आले, तेव्हापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या तब्येतीत काहीशा सुधारणा असल्याच्या दिसून आल्या होत्या. मात्र व्हेंटिलेटर काढल्यानंतर त्यांना श्वासोच्छवास करायला त्रास होत होता. 

विद्या सिन्हा यांचे वय ७२ होते. त्यांची फुफ्फुसं आणि हृदय कमकूवत झाली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना अँजिओग्राफी करण्याचा सल्ला काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी दिला होता. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. विद्या यांनी सत्तरीचा काळ गाजवला होता. त्यांनी राजा काका या चित्रपटापासून त्यांच्या बॉलिवूड कारकिदीर्ला सुरुवात केली. पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यांच्या रजनिगंधा या दुस-या चित्रपटाला प्रेक्षकांनी, समीक्षकांनी डोक्यावर घेतले आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक दजेर्दार भूमिका साकारल्या. ८०च्या दशकात परदेशात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी बॉलिवूडला रामराम ठोकला होता.

विद्या यांनी काही वर्षांपूर्वी सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात कमबॅक केला. त्यानंतर त्यांनी काव्यांजली, कबूल है, कुल्फी कुमार बाजेवाला, चंद्र नंदिनी यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले. त्यांच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले. त्यांनी २००९ मध्ये त्यांचे पती नेताजी साळूंखे यांच्याविरोधात मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काहीच महिन्यात त्या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांचे हे दुसरे लग्न होते. त्यांचे पहिले लग्न वेंकटेश्वर अय्यर यांच्यासोबत झाले होते. वेंकटेश्वर आणि विद्या पूर्वी एकमेकांच्या शेजारी राहायचे, त्यातूनच त्यांची ओळख झाली आणि त्यांनी लग्न केले होते. अय्यर यांचे निधन १९९६ मध्ये झाले. विद्या आणि अय्यर यांनी १९८९ मध्ये एका मुलीला दत्तक घेतले होते.

टॅग्स :विद्या सिन्हाबॉलिवूड