फ्रान्समधील प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवाला (Cannes Film Festival) सुरुवात झाली आहे. ११ दिवस हा सोहळा कान्स शहरात पार पडणार आहे. फ्रेंच रिव्हेरा या सुंदर नदीकाठी या सोहळ्याचं आयोजन केलं जातं. जगभरातील अनेक सेलिब्रिटी फॅशनेबल लूकसह याठिकाणी हजेरी लावतात. भारतातून ऐश्वर्या, सोनम, दीपिका यासह अनेक अभिनेत्रींच्या स्टाईलकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं असतं. दरम्यान यंदा आपल्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी उर्फी जावेदही (Urfi Javed) कान्समध्ये पदार्पण करणार होती. मात्र व्हिसा रिजेक्ट झाल्याने उर्फीचं हे स्वप्न भंगलं आहे.
कायम अतरंगी स्टाईल करणाऱ्या उर्फी जावेदची फॅशन जगात चर्चा असते. अंगप्रदर्शन करणारे कपडे घातल्याने सुरुवातीला खूप ट्रोल केलं गेलं. नंतर तिने टाकाऊ गोष्टींपासून बनवलेले कपडे परिधान केले. तिच्या या युनिक कल्पनेची अनेकांनी स्तुतीही केली. याच जोरावर उर्फीला कान्सला जाण्याची संधी मिळाली होती. मात्र तिचा व्हिसाच रिजेक्ट झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने लिहिले, "मी गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर दिसले नाही. कारण मी एका फेजमधून जात आहेत. माझा बिझनेस ठप्प झाला आहे. रिजेक्शन्स झेलत मी अनेक वेगळ्या गोष्टी केल्या. मग अचानक मला कान्सला जाण्याची संधी मिळाली. यासाठी दिपा खोसला आणि क्षितिज कंकारियाचे आभार. पण नशिब बघा माझा व्हिसा रिजेक्ट झाला. आम्ही खरंतर अनेक कल्पनांवर काम करत होतो. मात्र आता मी आणि माझी टीम निराश झालो आहोत."
"तुम्ही देखील आयुष्यात अनेक रिजेक्शन्सला सामोरे जात असाल. आपण एकमेकांसाठी उभे राहुया आणि एकमेकांना पाठिंबा देऊया. याने आणखी चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळत राहील. रिजेक्शन मिलाल्यावर रडणं हे नॉर्मल आहे. उलट हे हेल्दीही आहे. मीही रडते पण पुढे काय? प्रत्येक रिजेक्शन ही नवी संधी असते. अनेक रिजेक्शननंतरही मी थांबलेले नाही आणि तुम्हीही हार मानू नका."