Join us  

ट्रोलरने अभिषेक बच्चनला दिला वडापाव विकण्याचा सल्ला! ज्युनिअर बच्चनने दिले सणसणीत उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 3:52 PM

कदाचित अभिषेक बच्चन ट्रोलर्सचा सगळ्यात आवडता अभिनेता आहे. कारण कुठल्या ना कुठल्या कारणाने अभिषेक ट्रोलर्सचे लक्ष्य ठरतोच ठरतो. आता तर अभिषेकही या ट्रोलर्सची बोलती कशी बंद करायची, हे शिकला आहे.

कदाचित अभिषेक बच्चन ट्रोलर्सचा सगळ्यात आवडता अभिनेता आहे. कारण कुठल्या ना कुठल्या कारणाने अभिषेक ट्रोलर्सचे लक्ष्य ठरतोच ठरतो. आता तर अभिषेकही या ट्रोलर्सची बोलती कशी बंद करायची, हे शिकला आहे. पुन्हा एकदा त्याने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.अलीकडे अभिषेक बच्चनचामनमर्जियां’ हा चित्रपट रिलीज झाला. अभिषेकने सुमारे दोन वर्षांनंतर या चित्रपटाद्वारे वापसी केली. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाकडून अनेकांना प्रचंड अपेक्षा होत्या. खरे तर ‘मनमर्जियां’ला समीक्षकांनी चांगलीचं दाद दिली होती. पण प्रेक्षकांनी मात्र या चित्रपटाकडे पाठ फिरवली. साहजिकचं अभिषेकला लक्ष्य करण्याची आणखी एक संधी ट्रोलर्सला मिळाली. एका ट्रोलरने याचवरून अभिषेकला लक्ष्य केले. केवळ इतकेच नाही तर अभिषेकला अ‍ॅक्टिंग सोडून वडापाव विकण्याचा सल्लाही त्याने दिला. 

 ‘मनमर्जियां बॉक्सआॅफिसवर फ्लॉप झाला आहे. अभिषेकने पुन्हा एकदा दाखवून दिले की, तो चांगले चित्रपट फ्लॉप करण्यात किती निपुण आहे. स्टारकिड्सनी वडापाव विकणे सुरू करण्याची वेळ आली आहे,’ असे या ट्रोलर्सने लिहिले. हे ट्विट वाचून अभिषेक अर्थातचं खवळला आणि त्याने एकापाठोपाठ एक असे तीन ट्विट करून या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले.

 ‘मी पूर्ण सन्मानपूर्वक सांगू इच्छितो की, अशी कमेंट करण्यापूर्वी तुमच्यासारख्या मोठ्या डॉक्टरकडे सर्व गोष्टीचे ज्ञान असायला हवे. तुम्ही रूग्णांचा उपचार करण्यापूर्वी तरी असे करत असाल, अशी आशा आहे,’ असे पहिले ट्विट त्याने केले.

 दुसऱ्या ट्विटमध्ये अभिषेकने ट्रोल करणा-याचा चांगलाच क्लास घेतला. ‘तुमच्या माहितीसाठी सांगतो की, वडापाव विकणा-यांनाही त्यांची एक प्रतिष्ठा असते. दुस-या पेशाचा अनादर होऊ नये, असे प्रयत्न करा. आपण सगळेच चांगले काम करतो,’असे त्याने लिहिले.

 तिस-या ट्विटमध्येही त्याने ट्रोल करणा-याला चांगलेच सुनावले. ‘शेवटी मी इतकेच म्हणेल की, बॉक्सआॅफिसवर सध्या धूम करत असलेल्या ‘स्त्री’मध्येही एक स्टारकिड आहे. तुमचा दिवस चांगला जावो, मी आशा करतो की, तुम्ही एक उत्तम डॉक्टर बनण्यासाठी कष्ट घ्याल, ट्रेड अ‍ॅनालिस्ट बनण्यासाठी नाही.. ’असे त्याने लिहिले.

टॅग्स :अभिषेक बच्चनमनमर्जियांतापसी पन्नूविकी कौशल