Join us

ट्विंकल खन्नाने बाबा राम रहीमवर ओढले ताशेरे, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 20:59 IST

अभिनेत्री ट्विंकल खन्ना तिच्या परखड विचारांसाठी ओळखली जाते. जेव्हा-केव्हा देशात एखाद्या मुद्द्यावरून वादंग निर्माण होते तेव्हा मिसेस फनीबोन्स त्यावर आपले ...

अभिनेत्री ट्विंकल खन्ना तिच्या परखड विचारांसाठी ओळखली जाते. जेव्हा-केव्हा देशात एखाद्या मुद्द्यावरून वादंग निर्माण होते तेव्हा मिसेस फनीबोन्स त्यावर आपले परखड मत व्यक्त करते. कधी-कधी तर तिच्या या विचारांमुळे तिला ट्रोलही केले गेले. मात्र अशातही ती न डगमगता आपल्या मतावर ठाम राहिली. शिवाय न घाबरता लोकांचे आरोप धुडकावून लावले. सध्या देशात बाबा राम रहीम प्रकरण खूपच गाजत आहे. या प्रकरणावर मोठमोठे राजकारणी बोलणे टाळत आहेत. परंतु ट्विंकलने यावर तिचे परखड मत व्यक्त केले आहे. तिने टाइम्स आॅफ इंडियामध्ये तिच्या नियमित कॉलममध्ये यावर आपले मत मांडले आहे. ट्विंकलने कॉलममध्ये लिहिले की, ‘हेच या लोकांना काम आहे आणि मला याविषयी कुठल्याही प्रकारची अडचण नाही. मात्र मला एक गोष्ट सर्वांत जास्त खटकते. ती म्हणजे, आपण कशा पद्धतीने आपली बुद्धी या बाबांना समर्पित केली आहे.’ २००२ मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या बाबा राम रहीमला न्यायालयाने दोषी ठरविले आहे. न्यायालयाने रामरहीमला दोषी सिद्ध करताच त्याच्या भक्तांनी पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या विविध भागांत उपद्रव करीत शासकीय मालमत्तेचे प्रचंड नुकसान केले. विशेषत: पंचकुमाल आणि सिरसा या भागात रहीमच्या भक्तांनी कळसच केला. तथाकथित भक्तांच्या या उपद्रवामुळे पंजाब आणि हरियानामुळे सुमारे ३० ते ४० लोकांचा मृत्यू झाला. आपल्या लेखाव्यतिरिक्त ट्विंकल खन्नाने ट्विटही केले. ट्विटमध्ये लिहिले की, ‘ही आपलीच चूक आहे की, अशाप्रकारच्या बाबांना आपण आपल्यात स्थान देतो. आपण अशा लोकांमध्ये सूर्याचा प्रकाश शोधतो. मात्र हे लोक आपल्याला वेड्यात काढतात.’ यावेळी ट्विंकलने तिच्या कॉलमची लिंकही या ट्विंटमध्ये शेअर केली. वास्तविक ट्विंकलनेच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी बाबा राम रहीम प्रकरणावर आपले मत व्यक्त केले. अभिनेते ऋषी कपूर यांनी तर ‘हा मुर्खपणाचा कळस झाला’ अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, रामरहीम प्रकरणावर उद्या न्यायालय त्यांना शिक्षा सुनावणार असून, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे सरकारसमोर आव्हान आहे. शिवाय न्यायालयानेही राज्य आणि केंद्र सरकारला फटकारल्याने सुरक्षेबाबत चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. राम रहीमच्या समर्थकांची धरपकड केली जात असल्याचेही समजते. तर काहींना शहराच्या बाहेरच हाकलण्यात आले आहे.