Join us  

आधी व्यवसाय गेले अन् आता मानाचा फिल्मफेअरही गुजरातला होणार, दोन दिवस रंगणार सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 2:17 PM

महाराष्ट्रातील महत्वाच्या तीन प्रोजेक्टनंतर आता फिल्मफेअरही गुजरातला गेला

हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कार (69th Hyundai Filmfare Awards 2024) सोहळा यंदाही होणार आहे. हे फिल्मफेअरचं यंदाचं 69 वं वर्ष आहे. विशेष म्हणजे दरवर्षी मुंबईतच होणारा हा पुरस्कार सोहळा यंदा गुजरातला होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महत्वाच्या तीन प्रोजेक्टनंतर आता फिल्मफेअरही गुजरातला गेला असा सूर उमटला आहे. काल जियो वर्ल्ड सेंटर येथे  फिल्मफेअरकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा झाली. फिल्म निर्माता करण जोहर, अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यावेळी उपस्थित होते.

69 वा ह्युंडाई फिल्मफेअर पुरस्कार सोहळा 2024 यंदा गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे २७ आणि २८ जानेवारी असे दोन दिवस रंगणार आहे. बॉलिवूड तारे तारकांची गर्दी सोहळ्याला होणार आहे. 'गुजरात टुरिझम'च्या सहकार्याने हा सोहळा पार पडणार आहे.2020 चा अपवाद वगळता आातापर्यंत फिल्मफेअर पुरस्कार सोहळा महाराष्ट्रातच झाला आहे. 2001 पासून निर्माता करण जोहरच सोहळ्याचं सूत्रसंचालन करत आहे. याही वेळी त्यालाच ही संधी मिळाली आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना करण म्हणाला,'मी खूपच आतुर आहे कारण याहीवेळी मीच सूत्रसंचालन करणार आहे. गुजरातला जाऊन तेथील संस्कृती, परंपरा आणि आता सशक्तीकरण, आर्थिक विकास असलेल्या या भूमीवर मी हा सोहळा साजरा करेन.'

तो पुढे म्हणाला,'फिल्मफेअरचा माझ्या सूत्रसंचालन होण्यात मोठा वाटा आहे. २००१ साली मला पहिल्यांदा सूत्रसंचानलनाची संधी फिल्मफेअरनेच दिली. मी पहिल्यांदा आत्मविश्वासाने व्यासपीठावर उभा राहिलो. त्यामुळे माझं फिल्मफेअरशी भावनिक नातं जोडलं गेलं आहे.'

एकीकडे प्रोजेक्ट्स गुजरातला जात असतानाच फिल्मफेअर सोहळाही यंदा गुजरातलाच गेला असा सूर उमटत आहे. तारेतारकांनी खच्चून भरलेल्या या फिल्मफेअर सोहळ्याची आतुरता कायमच असते. दरवर्षी मुंबईतच होणारा सोहळा आता गुजरातला जातो म्हणल्यावर चर्चेला उधाण आलं आहे.

टॅग्स :फिल्मफेअर अवॉर्डगुजरातमुंबईबॉलिवूडकरण जोहर