Join us
Daily Top 2Weekly Top 5

जोधपूरच्या विमानतळावर तब्बूची काढली छेड; अनोळखी व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने केला स्पर्श!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 21:40 IST

जोधपूर विमानतळावर पोहोचताच एका व्यक्तीने तब्बूची छेड काढण्याचा प्रयत्न केला, त्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असून, याबाबतचा एक व्हिडीओ समोर येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूची छेड काढल्याची घटना समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, जोधपूर विमानतळावर एका अनोळखी व्यक्तीने तिला चुकीचे पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तब्बू जोधपूर येथे बहुचर्चित काळविट शिकार प्रकरणाच्या सुनावणीसाठी पोहोचली आहे. तिच्यासोबत अभिनेता सैफ अली खान आणि सोनाली बेंद्रे हेदेखील पोहोचले. जेव्हा तब्बू विमानतळाबाहेर येत होती, तेव्हाच चाहत्यांच्या गर्दीतून आलेल्या एका व्यक्तीने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. ही व्यक्ती सातत्याने तिचा हात तब्बूच्या खांद्यावर ठेवत होती. तसेच तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत होती. तिच्या या प्रकारामुळे तब्बूला चांगलाच संताप आला. तिने त्याला खडेबोल सुनावले. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला असून, त्यामध्ये तब्बू संबंधित व्यक्तीवर संतापताना दिसत आहे. दरम्यान, १९९८ मध्ये ‘हम साथ-साथ हैं’ या चित्रपटाच्या शूटिंगप्रसंगी जोधपूर येथे काळविट शिकार प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सलमानवर आरोप आहे की, त्याने २७-२८ सप्टेंबर दरम्यान रात्रीच्या सुमारास भवाद गावात हरणाची शिकार केली. तर १ आॅक्टोबर रोजी कांकाणी गावात काळविटची शिकार केली. सलमान व्यतिरिक्त या प्रकरणात सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे हेदेखील संशयित आरोपी आहेत. उद्या या प्रकरणाचा निकाल असून, सर्वांचेच लक्ष त्याकडे लागले आहे. जर या प्रकरणातील सर्व संशयितांवर आरोप निश्चित झाले तर वाइल्ड लाइफ अ‍ॅक्टच्या कलम १४९ अंतर्गत त्यांना सहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. सध्या या प्रकरणातील सर्व संशयित जोधपूर येथे पोहोचले असून, सलमानही उद्या जोधपूर न्यायालयात उपस्थित राहणार आहे.