Join us
Daily Top 2Weekly Top 5

साईदर्शनानंतर मराठी भाषेवर सुनील शेट्टीचं मोठं वक्तव्य, म्हणाला "माझी जन्मभूमी कर्नाटक अन् मुंबई ही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 16:25 IST

सध्या सुरू असलेल्या हिंदी भाषेच्या वादावर सुनील शेट्टींची ही प्रतिक्रिया विशेष ठरली.

 Sunil Shetty On Marathi Language: गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय चांगलाच गाजला. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करु नये, अशी मागणी करत विरोधक या निर्णयाविरोधात मराठीप्रेमी, कलाकार आणि सामाजिक संस्था चांगल्याचं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर अखेर त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय सरकारने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रद्द केले. या पार्श्वभूमीवर आता बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यानेही साईदर्शनानंतर मराठी भाषेबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याची ही प्रतिक्रिया प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला भिडणारी ठरली आहे. 

सुनील शेट्टी याने आज सोमवारी शिर्डीमध्ये साईदर्शन घेतलं आहे. साईदर्शनानंतर त्यानं माध्यमांशी संवाद साधला. साईबाबांवरची श्रद्धा, मंदिर व्यवस्थेचं कौतुक या सर्व बाबींवर त्यांनी मनमोकळं मत मांडलं. मात्र सर्वात विशेष ठरलं, ते म्हणजे मराठी भाषेबाबतचं त्यांचं वक्तव्य. जन्मभूमी आणि कर्मभूमी याविषयी तो म्हणाला, "मी मुंबईमध्ये राहतो. माझी जन्मभूमी कर्नाटक आहे. तर माझी कर्मभूमी मुंबई आहे. मला मराठी नाही आली तरी चाललं असतं. मात्र मी मराठी भाषेत बोलल्यावर तुम्हाला चांगलं वाटतं सर्वांना बरं वाटतं. मी कर्मभूमीत राहून मराठीत नाही बोललो, तर दुसऱ्यांना त्रास व्हायला नाही पाहिजे, तर तो त्रास मला व्हायला पाहिजे. मला वाटतं की मला मराठी शिकायचं आहे आणि तुम्ही सगळे बोलतात तसं मराठी मला बोलायचं आहे", असं त्यानं म्हटलं. 

सुनील शेट्टी तब्बल सहा वर्षांनंतर शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शनासाठी पोहोचला होता. यावेळी त्याने आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं, "मी गेल्या कित्येक वर्षांपासून साईंच्या दर्शनाला येतो, मात्र यावेळी सहा वर्षांचं अंतर पडलं. माझी पत्नी मात्र दरवर्षी इथे येत असते. बाबांचं बोलावणं आज आलं. साईंचं दर्शन घेता आलं याचा खूप आनंद झाला. त्यांच्या दर्शनाने डोळे भरून येतात. मी बाबांकडे कधीच काही विशेष मागितलेलं नाही, फक्त हेच प्रार्थना करतो की सर्वजण सुखी आणि निरोगी राहावेत". यासोबतच त्याने मंदिर व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केलं. तो म्हणाला, "मी वर्षानुवर्ष वेगवेगळ्या मंदिरात दर्शनासाठी जात असतो. साईमंदिरातील व्यवस्था दिवसेंदिवस अधिक सुलभ, सुव्यवस्थित आणि भक्तांसाठी सोयीस्कर होत चालली आहे", असं त्यानं म्हटलं. 

टॅग्स :सुनील शेट्टीसेलिब्रिटीमराठीमहाराष्ट्रमुंबई