Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवींचे अंत्यदर्शन घेण्यासाठी दोन दिवसांपासून घराबाहेर उभा होता हा चाहता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 14:38 IST

श्रीदेवी यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी हा चाहता गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या घराबाहेर उभा आहे. तो आता श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी भलेही या जगाचा निरोप घेतला असला तरी, चाहत्यांच्या हृदयात त्या कायम जीवंत राहणार आहेत. श्रीदेवी यांना अलविदा म्हणण्यासाठी देशभरातील चाहते मुंबईत पोहोचले असून, अतिशय शोकाकुल अशा वातावरणात त्या आपल्या सुपरस्टारच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत आहेत. त्यांचे कित्येक चाहते सध्या पाहटेपासूनच त्यांच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. यामध्ये त्यांच्या एका खास चाहत्याचा समावेश असून, तो गेल्या दोन दिवसांपासून श्रीदेवी यांच्या बंगल्यासमोर त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी ठाण मांडून बसला आहे. होय, उत्तर प्रदेश येथील जतिन वाल्मिकी दृष्टीबाधित असून, तो श्रीदेवी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मुंबईत पोहोचला आहे. 



एएनआयशी बोलताना जतिनने म्हटले की, श्रीदेवी यांचे माझ्या आयुष्यात खूपच महत्त्वपूर्ण स्थान आहे. श्रीदेवीमुळेच माझा भाऊ जीवंत असून, त्यांच्या माझ्या कुटुंबावर खूप उपकार आहेत. श्रीदेवी यांनी जतिनच्या भावाच्या ब्रेन ट्यूमरच्या आॅपरेशनसाठी एक लाख रूपयांची आर्थिक मदत केली होती. त्याचबरोबर रुग्णालयाला देखील एक लाख रूपये माफ करण्यास सांगितले होते. 
 
श्रीदेवी यांच्या निधनामुळे अतिशय दु:खी झालेल्या जतिनने म्हटले की, त्यांच्यामुळेच माझा भाऊ आज जीवंत आहे. मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही, परंतु मी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होणार आहे. श्रीदेवी यांचे निधन शनिवारी रात्री दुबई येथे झाले होते. काल रात्रीच त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान विले पार्ले येथील पवन हंस स्मशान भूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सध्या त्यांची अंत्ययात्रा सुरू असून, इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार त्यात सहभागी झाले आहेत.