Join us  

'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 1:29 PM

'सिंघम अगेन'च्या सेटवरुन बाजीराव सिंघम साकारणाऱ्या अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 

रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. 'सिंघम' आणि 'सिंघम रिटर्न' या सिनेमांच्या सक्सेसनंतर याचा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सिंघम ३'च्या शूटिंगला सुरुवात झाली असून काहीच दिवसांपूर्वीच सिनेमाच्या सेटवरील फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये दीपिका पदुकोण लेडी सिंघमच्या वेशात दिसली होती. आता 'सिंघम अगेन'च्या सेटवरुन बाजीराव सिंघम साकारणाऱ्या अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 

सध्या सिंघमचं शूटिंग जम्मू-काश्मीरमध्ये सुरू आहे. या शूटिंगदरम्यान अजय देवगण आणि रोहित शेट्टीने सशस्त्र सीमा बल(SSB) जवानांची भेट घेतली. याचे फोटो अजय देवगणने शेअर केले होते. त्यानंतर आता त्याने सिनेमातील लूकचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात अजय देवगण लष्करी फौजेसह उभं असल्याचं दिसत आहे. "ऑन ड्युटी...अगेन", असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. अजय देवगणच्या हा बाजीराव सिंघमचा लूक पाहून चाहत्यांची या सिनेमाबाबत उत्सुकता वाढली आहे. 

रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये बॉलिवूड कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. अजय देवगणबरोबर या सिनेमात दीपिका पदुकोण, रणवीर सिंह दिसणार आहेत. तर बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात जॅकी श्रॉफही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम' सिनेमा २०११ साली प्रदर्शित झाला होता. साऊथमधील 'सिंघम' सिनेमाचा हा रिमेक होता. 'सिंघम'नंतर या सिनेमाचा सिक्वलही २०१४ साली प्रदर्शित करण्यात आला होता. आता तब्बल १० वर्षांनंतर या सिनेमाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २०२५ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. 

टॅग्स :अजय देवगणरोहित शेट्टीसिनेमा