Join us

SHOCKING : उधारी वसूल करण्यासाठी बुकी करायचे मलाइका अरोराला फोन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 15:40 IST

आयपीएल बेटिंग प्रकरणी अभिनेता आणि निर्माता अरबाज खान याची नुकतीच ठाणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असून, त्यादरम्यान त्याच्याकडून अनेक ...

आयपीएल बेटिंग प्रकरणी अभिनेता आणि निर्माता अरबाज खान याची नुकतीच ठाणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असून, त्यादरम्यान त्याच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. अरबाजने सट्टा लावल्याची कबुली दिली. त्याचबरोबर गेल्या पाच ते सहा सीजनमध्ये सट्टा लावल्याचे त्याने मान्य केले. मलाइकाबरोबरचे वैवाहिक संबंध संपुष्टात येण्याचे कारणही बेटिंगच असल्याचे त्याने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाज सट्टेबाजीमुळे चांगलाच कर्जबाजारी झाला होता. सट्टेबाजीमुळे त्याच्यावर तब्बल दोन कोटी ७५ लाख रूपये कर्ज झाले होते. बुकी त्याच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी त्याला सातत्याने फोन करायचे. कालांतराने अरबाज बुकीच्या या तगाद्याला इतका वैतागला होता की, तो त्यांचे फोन टाळायचा. अशात बुकी अरबाजची पूर्व पत्नी मलाइका अरोराला फोन करायचे. तिच्याकडे पैशांची मागणी करायचे. या कारणावरून अरबाज आणि मलाइकामध्ये सातत्याने भांडणे व्हायची. अरबाजने सट्टा लावण्याचे व्यसन सोडावे असे मलाइका त्याला सातत्याने सांगायची. परंतु अरबाज या व्यसनापासून दूर जात नव्हता. त्याच्यामुळे त्यांच्यातील नात्यात दुरावा निर्माण होत गेला. जेव्हा ही बाब सलमान खानच्या कानावर पडली तेव्हा त्यानेही त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु अरबाज ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. अशात एकेदिवशी सलमान आणि अरबाजमध्ये खूप कडाक्याचे भांडण झाले होते. एकदा तर सलमान अरबाजवर धावून गेला होता. परंतु कुटुंबीयांनी मध्यस्ती करीत त्यांचा वाद मिटविला. पुढे अरबाज सट्टा लावण्याचे व्यसन सोडण्यास तयार नसल्याने मलाइकाने त्याला सोडचिठ्ठी देणे अधिक योग्य समजले. अशापद्धतीने मलाइका आणि अरबाजचा १७ वर्षांचा संसार तुटण्यास सट्टा कारणीभूत ठरला. स्वत: अरबाजनेच पोलिसांच्या चौकशीदरम्यान यास दुजोरा दिला आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणी तपास करीत असून, आणखी बॉलिवूडमधील सेलिब्रिटी यामध्ये अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.