Join us

‘शेवंतामाई’ सांगतेय बळीराजाची व्यथा..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 12:55 IST

देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झालीय. अस्मानी आणि सुल्तानी संकटामुळे बळीराजा अडचणीत सापडलाय. शेतकऱ्यांची हीच व्यथा मांडणारा बारोमास हा सिनेमा ...

देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झालीय. अस्मानी आणि सुल्तानी संकटामुळे बळीराजा अडचणीत सापडलाय. शेतकऱ्यांची हीच व्यथा मांडणारा बारोमास हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सीमा विश्वास या महत्त्वपूर्ण व्यक्तीरेखा साकारतायत. याच निमित्ताने सीएनएक्सने त्यांच्याशी केलेली ही खास बातचित.

 

प्रश्न : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील आणखी एक ज्वलंत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. काय आहे बारोमास?

बारोमास हा सिनेमा सदानंद देशमुख यांच्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बारोमास या कादंबरीवर आधारित आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, त्यांच्या समस्या, शेतकरी आत्महत्या या आणि अशा अनेक गोष्टी या सिनेमात दाखवण्यात आल्यात. नापिकी, अपुरा पाऊस, दुष्काळ, महागाई, भ्रष्टाचार, सावकारी पाश आदींच्या विळख्यात शेतकरी अडकलाय. शेतकऱ्यांच्या याच समस्या समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहचाव्या या उद्देशाने बारोमास या सिनेमाची निर्मिती करण्यात आलीय.

प्रश्न : या सिनेमात आपण एक वेगळी भूमिका साकारताय जी खूप संवेदनशील आहे. त्याविषयी जाणून घ्यायचंय?

या सिनेमात शेवंतामाई नावाची भूमिका मी साकारतेय. आईची ही भूमिका खूप संवेदनशील आहे.. शेवंतामाई ही कणखर स्त्री आहे.. आपल्या कुटुंबावर संकट आलं तरी ती खंबीरपणे त्याचा मुकाबला करते. पती, मूलं आणि संपूर्ण कुटुंबावर आलेल्या संकटाला ती सामोरं जाते. अशा पद्धतीची ही भूमिका आहे. ही भूमिका ऐकूनच सुन्न झाले. भूमिकेतील आव्हानं पाहून तत्काळ सिनेमासाठी होकार दिला.

प्रश्न : शेतकरी आत्महत्या करतो असं अनेकदा ऐकलंय, मात्र शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याचं कधीही ऐकलं नाही. तर हा मुद्दाही या सिनेमात अधोरेखित करण्यात आलाय का?

खरंय तुमचं.. कारण शेतकरी निराश होतो, खचून जातो आणि आत्महत्या करतो. मात्र अशा परिस्थितीत कुटुंबाला सावरते ती फक्त त्या कुटुंबातील स्त्री. कुटुंबावर कितीही आघात आले तरी ती त्याचा नेटाने सामना करते. कारण दु:खातून स्वत:ला सावरणं हेच तिच्यापुढंचं आव्हान नसंत. तिच्यापुढे आगामी काळात येणाऱ्या संकटाचा विचार करुन तिला खंबीर व्हावं लागतं हीच परिस्थिती रियल लाईफमध्ये आहे आणि तेच सिनेमातही पाहायला मिळेल.

प्रश्न : हा सिनेमा फक्त शेतकऱ्यांवर आधारित आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल का?

बारोमास हा सिनेमा फक्त शेती आणि शेतकरी यांच्यापुरता मर्यादित नाही. एका शेतकरी कुटुंबातील आई-वडील, भाऊ-भाऊ, वडील-मुलं यांच्यातील नात्यांचे विविध कंगोरे आणि वास्तवदर्शी चित्रण या सिनेमात पाहायला मिळेल. आर्थिक, सामाजिक विषमतेमुळे एका शेतकरी कुटुंबाला काय काय सहन करावं लागतं, परिस्थितीमुळे निर्माण होणारी बेकारी, भावाभावांमधली तेढ आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंब कसं उद्ध्वत होतं हे तुम्हाला पाहायला मिळेल.

प्रश्न : या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी काय काय अनुभव आले ?

या सिनेमाचं शूटिंग अमरावतीमध्ये करण्यात आलं. अमरावतीमध्ये शेतकरी कुटुंबांच्या व्यथा जवळून अनुभवता आल्या. मात्र याचसोबत विविध समस्या यावेळी सुद्धा जाणवल्या. मासिक पाळीसारख्या मुद्यावरुन आजही स्त्रीशी कसा दुजाभावा केला जातो हे एका गावात मला पाहायला मिळालं. खरंच आपण म्हणतो की आपण प्रगती केली. वैचारिक प्रगती केली. मात्र गावागावात आजही रुढी आणि परंपरा कायम आहेत. ते पाहून मन विषण्ण झालं.

प्रश्न : नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे खचलेल्या शेतकऱ्याला आधार देतायत.. तुम्हाला वाटतं का की बडे लोक शेतकऱ्याला आधार देण्यात कमी पडतायत?

शेतकरी जगला तर देश जगेल. त्यामुळं आता संकटात असलेल्या शेतकऱ्याला आधार देणं खूप गरजेचं आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे करत असलेलं काम खरचं खूप कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत न देता त्यांना स्वयंपूर्ण करण्याचा त्यांनी सुरू केलेला उपक्रम खूप चांगला आहे. त्यांच्या कामातून श्रीमंत लोकांनी प्रेरणा घ्यायला हवी. त्यांनी स्वत:हून पुढे येऊन शेतकऱ्याला मदत करावी. आज असे अनेकजण असतील ही की शेतकऱ्यांना मदत करत असतील. त्यांचं कार्य समोर येत नसेल. नाना आणि मकरंद यांचं जमिनीशी, शेतकऱ्यांशी नातं जोडलं गेलंय. त्यामुळं ते करत असलेलं काम इतरांना जमेलच असं नाही. पण शेतकऱ्यांना मदत करताना प्रत्येकानं आपला खारीचा वाटा उचलावा असं वाटतं.

प्रश्न : आपण आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्यात आपण गंभीर प्रकारच्या भूमिका जास्त होत्या. कधी वाटलं का की हे नको काही तरी वेगळं करायला हवं ?

थिएटरशी माझा संबंध असल्यानं मला आव्हानं आवडतात. गंभीर भूमिका साकारणंही मी तितकंच एन्जॉय केलं. मात्र कधी कधी वाटतं की गंभीर भूमिकांपेक्षा काही तरी वेगळं करावं. एखादी कॉमेडी किंवा इतर कोणतीही भूमिका साकारावी असं मनात येतं. मात्र स्क्रीप्टच्या कथेनुसार भूमिका असेल तर त्याला मी माझ्या परीने शंभर टक्के न्याय देते.

 

प्रश्न : आगामी काळात कोणत्या सिनेमात आपण काम करत आहात?

येत्या काळात विविध सिनेमांमध्ये काम करतेय. यांत हिंदी, इतर भाषिक सिनेमा आणि काही आंतरराष्ट्रीय सिनेमांचा समावेश आहे. आजवर जसं काम केलं तसंच प्रामाणिकपणे भूमिकेला न्याय देत काम करत राहण्याचा मानस आहे.

- suvarna.jain@lokmat.com