'थ्री ऑफ अस', 'डार्लिंग्स' या हिंदी सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री शेफाली शाह लोकप्रिय आहे. शेफालीची नुकतीच 'दिल्ली क्राइम सीरिज ३' आली आहे. शेफालीने प्रत्येक भूमिकेतून आपल्या अभिनयाची छाप पाडली. करिअरच्या सुरुवातीला तिला तिच्या वयापेक्षा मोठ्या भूमिका ऑफर झाल्या. वयाच्या २८ व्या वर्षी तिने अक्षय कुमारच्या आईची भूमिका केली होती. यानंतर तिला आईचेच रोल ऑफर होऊ लागले. पण शेफालीने स्वत:ला टाइपकास्ट होऊ दिलं नाही. आता नुकतंच तिने इंडस्ट्रीत आजही संघर्ष करावा लागतो असा खुलासा केला.
'न्यूज १८ शोशा'ला दिलेल्या मुलाखतीत शेफाली शाह म्हणाली, "माझ्या करिअरची सुरुवात चांगली झाली होती. पण पात्रता असूनही मला यशस्वी अभिनेत्री होता आलं नाही. माझा पहिला सिनेमा 'सत्या' होता. त्यात माझा सातच मिनिटांचा रोल होता पण तो खूप गाजला होता. त्यामुळे मी सुरुवातीलाच हे शिकले की भूमिका छोटी असो वा मोठी हे महत्वाचं नाही. आधीच्या सिनेमांमध्ये अभिनेत्याला सर्वात जास्त फुटेज मिळायचं. अभिनेत्री आणि खलनायकही बऱ्यापैकी दिसायचे. पण सहकलाकारांना फार कमी स्क्रीन स्पेस मिळायची."
ती पुढे म्हणाली, "आजही इंडस्ट्रीत स्थान मिळवणं सोपं नाही. त्यात पैसा हा गुंतागुंतीचा विषय आहे. पण माझा सिल्वर लायनिंगवर विश्वास आहे. आज जर मी सेलिब्रिटी लोकांसोबत उठबस करते तर मला माझ्यासाठी सीट मागण्यात काहीच हरकत वाटत नाही. मी यावर जास्त विचार करत नाही. सिनेमा मागणं आणि काम मागणं यासंदर्भात मी बोलत आहे."
" माझ्या कामासाठी मी तुला जास्तीचे पैसे देतो किंवा देते असं म्हणणारे एकही निर्माता मला बऱ्याच काळापासून भेटलेले नाहीत. आमच्याजवळ पैसे आहेत असं त्यांनी मला कधीच सांगितलं नाही. कोणाजवळच बजेट किंवा पैसा नसतो. पण मूलभूत मानधन माझा हक्क आहे ज्यासाठी मी पात्र आहे. ते मागण्यात मला लाज वाटत नाही", असंही ती म्हणाली.