Join us

शाहरूख खानने दिले संकेत; सलमान खानसोबत २०२० मध्ये करणार चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 14:24 IST

एकेकाळचे जाणी दुश्मन अन् आता झालेले जीवलग मित्र शाहरूख खान आणि सलमान खान यांनी पुन्हा एकदा एकत्र झळकावे अशी ...

एकेकाळचे जाणी दुश्मन अन् आता झालेले जीवलग मित्र शाहरूख खान आणि सलमान खान यांनी पुन्हा एकदा एकत्र झळकावे अशी त्यांच्या चाहत्यांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची अपेक्षा आहे. आता ही अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता असून, हे दोघे २०२० मध्ये एकत्र स्क्रीन शेअर करताना बघावयास मिळणार आहेत. हे आम्ही नाही तर दस्तुरखुद्द किंग शाहरूख खानने सांगितले आहे. एका वेबसाइटला मुलाखत देताना शाहरूखने म्हटले की, आम्ही एकत्र काम करावे अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. परंतु सध्या सलमान, आमिर आणि मी आम्ही तिघेही आपापल्या चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने एकत्र येण्याचा विचार केला नाही. परंतु सलमान आणि मला जर पडद्यावर बघायचे असेल तर त्यासाठी २०२० पर्यंत प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागेल, असे शाहरूखने म्हटले. नुकत्याच रिलीज झालेल्या सलमानच्या ‘ट्यूबलाइट’मध्ये शाहरूख केमिओ करताना बघावयास मिळाला. चित्रपटात त्याची भूमिका जरी छोटी असली तरी, प्रेक्षकांना ती प्रचंड आवडली. सलमानने चित्रपट रिलीज होण्याअगोदरच स्पष्ट केले होते की, चित्रपटात शाहरूखची भूमिका टर्निंग पॉइंट ठरणार आहे. त्यानुसारच शाहरूखने कमाल केल्याचे दिसून येतो. असो, वास्तविक या दोघांनी यापूर्वी एकत्र स्क्रीन शेअर केली. ‘करण-अर्जुन’मधील दोघांची भूमिका त्यावेळी प्रचंड गाजलीही होती. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांनी आपला जलवा दाखवावा, अशी त्यांची चाहत्यांची अपेक्षा आहे. जेव्हा शाहरूखला याविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने म्हटले की, माझ्या माहितीनुसार सध्या सलमान तीन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शिवाय आमिर खानदेखील त्याच्या ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मीदेखील दोन-तीन प्रोजेक्टवर काम करीत आहे. अशात पुढील दोन वर्ष आमचे शेड्यूल्ड ठरलेले असल्याने एकत्र काम करण्यासाठी वेळ देणे कोणालाच शक्य नाही. अशातही सलमान आणि मी २०२० मध्ये एकत्र येऊ शकतो. अर्थात त्याकरिता सर्व गोष्टी जुळून येणे गरजेचे असल्याचेही त्याने स्पष्ट केले. सध्या शाहरूख खान त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचा चौथा मिनी ट्रेलर कालच रिलीज करण्यात आला. चित्रपटात शाहरूखसोबत अनुष्का शर्मा स्क्रीन शेअर करणार आहे. या दोघांचा हा तिसरा एकत्र चित्रपट असेल. या चित्रपटाविषयी शाहरूखने म्हटले की, हा चित्रपट खूपच मजेशीर असेल. कारण चित्रपटात खूपच सिम्पल गोष्टी आहेत. हॅरी आणि सेजलची स्टोरी बघून ही आपलीच स्टोरी असावी असे वाटल्याशिवाय राहणार नाही.