Join us  

दीपिकामुळे शाहरुखच्या हातून गेला पद्मावत; 'या' एका अटीमुळे अलाउद्दीन खिलजीची भूमिका पडली रणवीरच्या पदरात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 10:39 AM

Padmaavat: पदमावत या सिनेमामध्ये प्रथम शाहरुख खान अलाउद्दीन खिलजी याची भूमिका साकारणार होता. मात्र, ऐनवेळी दीपिकाने ठेवलेल्या अटीमुळे त्याला हा सिनेमा सोडावा लागला.

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यांच्या दर्जेदार दिग्दर्शनासाठी कायमच ओळखले जातात. भव्यदिव्य सेट, कलाकारांचे महागडे कपडे, सिनेमांमध्ये दाखवण्यात येणारा राजेशाही थाट  यामुळे त्यांचा प्रत्येक सिनेमा चर्चेत येत असतो. हम दिल दे चुके सनमपासून ते पदमावतपर्यंत त्यांचा प्रत्येक सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजला आहे.  त्यामुळे सध्या त्यांच्या पदमावत या सिनेमाची चर्चा रंगली आहे. या सिनेमामध्ये रणवीर सिंह (Ranveer singh), दीपिका पदुकोण (deepika padukone) आणि शाहिद कपूर (shahid kapoor) मुख्य भूमिकेत आहेत. परंतु, रणवीर साकारात असलेल्या भूमिकेसाठी प्रथम  शाहरुख खानची (shahrukh khan) निवड करण्यात आली. मात्र, दिपिकामुळे त्याला ही भूमिका गमवावी लागली.

पदमावत या सिनेमामध्ये प्रथम शाहरुख खान अलाउद्दीन खिलजी याची भूमिका साकारणार होता. मात्र, ऐनवेळी दीपिकाने ठेवलेल्या अटीमुळे त्याला हा सिनेमा सोडावा लागला. विशेष म्हणजे शाहरुखने ठेवलेली अट मान्य नसल्यामुळे दीपिकाने भन्साळींसमोर एक नवीन अट ठेवली. दोन्ही कलाकारांच्या या अटीमुळे भन्साळी यांची कोंडी झाली होती. मात्र, त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी या सिनेमातून शाहरुखला आऊट करत रणवीरला इन केलं.

शाहरुखला का सोडावा लागला सिनेमा

पदमावतचं चित्रीकरण सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वी रणवीरने ऐनवेळी सिनेमात काम करण्यास नकार दिला. त्यामुळे भन्साळी थेट शाहरुखच्या घरी गेले आणि अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेसाठी शाहरुखला विचारणा केली. सिनेमाची कथा पाहता शाहरुखनेही होकार दिला. मात्र, त्याने एक अट ठेवली. शाहरुखने या सिनेमाचं नाव बदलण्यास सांगितलं. सिनेमाचं नाव अभिनेत्रीच्या नावाने असेल तर माझ्या चाहत्यांना ते आवडणार नाही असं म्हणत त्याने हे नाव बदलण्यास सांगितलं.

दीपिकानेही ठेवली भन्साळींसमोर अट

शाहरुखची अट ऐकल्यानंतर त्यांनी दीपिकाशी यावर चर्चा केली. मात्र, जर सिनेमाचं शीर्षक बदललं तर मी हा प्रोजेक्ट सोडेन असं दीपिकाने ठामपणे सांगितलं. त्यामुळे भन्साळींची कोंडी झाली. एकाच वेळी दोन्ही कलाकार सोडून जाण्यापेक्षा रणवीरला या सिनेमात घेणं कधीही योग्य ठरेल असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा रणवीरला या सिनेमासाठी तयार केलं.

दरम्यान, अखेर भन्साळींनी दीपिकाची अट मान्य करत सिनेमाचं नाव तेच ठेवलं. यासाठी त्यांना शाहरुखची अट अमान्य करत रणवीरला सिनेमासाठी तयार करावं लागलं. विशेष म्हणजे या सिनेमाचं नाव 'पद्मावती' ठेवल्यानंतर सोशल मीडियावर मोठा वादंग निर्माण झाला. अखेर या सिनेमाचं नाव पुन्हा बदलत ते 'पद्मावत' करण्यात आलं.

टॅग्स :पद्मावतदीपिका पादुकोणशाहरुख खानरणवीर सिंगशाहिद कपूरसंजय लीला भन्साळीबॉलिवूड