Join us  

किंग खानची ‘कस्टम’कडून कोंडी, विमानतळावर अडवले; बॅगेत मिळाली १८ लाखांची सहा महागडी घड्याळे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 7:28 AM

shahrukh Khan: शारजाहून मुंबईत परत येताना १८ लाखांची सहा घड्याळे घेऊन आलेल्या अभिनेता शाहरूख खानला शुक्रवारी रात्री उशिरा कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही तास थांबविले होते.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शारजा येथील एका कार्यक्रमाहून मुंबईत परत येताना १८ लाख रुपये किमतीची सहा घड्याळे घेऊन आलेल्या अभिनेता शाहरूख खान याला शुक्रवारी रात्री उशिरा कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही तास थांबविले होते. या घड्याळांवर लागू होणारे ६ लाख ८३ हजार रुपयांचे शुल्क भरल्यानंतरच त्याला जाऊ दिले. उपलब्ध माहितीनुसार, शारजा येथील एका कार्यक्रमासाठी शाहरूख खान मुंबईतून चार्टर विमानाने गेला होता. परत येताना शाहरूख, त्याचा मॅनेजर तसेच त्याचे काही सहकारी त्याच्यासोबत होते. चार्टर विमानानेच मुंबईला परतल्यानंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-३ येथे त्यांचे विमान उतरले. त्यानंतर शाहरूखसह त्याची टीम बाहेर येत असतानाच कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना थांबविले. त्यांच्याकडे काही घड्याळे असल्याचे अधिकाऱ्यांना स्कॅनिंगमध्ये दिसून आले होते. त्यांच्याकडे एकूण सहा महागडी घड्याळे आढळून आली. त्यांची किंमत १८ लाख रुपये इतकी आहे. त्याकरिता अधिकाऱ्यांनी शाहरूख खानला ६ लाख ८३ हजार रुपयांचे शुल्क भरण्यास सांगितले हाेते. शाहरूखने शुल्क भरल्यानंतर त्याला तेथून जाऊ देण्यात आले. शाहरूख जरी काही तासांत विमानतळावरून बाहेर पडला असला तरी त्याच्या टीममधील काही लोकांना मात्र बाहेर पडेपर्यंत पहाट झाली होती.

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडमुंबई