Join us

शबाना म्हणतायेत, ताकदीच्या अभिनेत्रीला वयाची मर्यादा नसते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 15:38 IST

संदिप अडनाईक ४७व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या फिल्म बाजारमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री आणि चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीच्या अध्यक्षा शबाना आझमी ...

संदिप अडनाईक ४७व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या फिल्म बाजारमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री आणि चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीच्या अध्यक्षा शबाना आझमी यांनी भाग घेतला. ‘अंकुर’, ‘अर्थ’, ‘खंडहर’, ‘पार’ यांसारख्या समांतर चित्रपटांनंतर ‘फकिरा’पासून ‘गॉडमदर’पर्यंत अनेक विविध विषयांवरील चित्रपटांत शबाना यांनी भूमिका केल्या. गतवर्षी ‘नीरजा’या बायोपिकमध्येही त्या दिसल्या. त्यांच्याशी केलेली ही बातचित.एक काळ होता, जेव्हा तुमच्या भूमिकांना वलय होते, आजही ते आहे का?- का नाही? पूर्वीच्या काळी अभिनेत्रींच्या वयाबरोबरच त्यांची कारकीर्दही संपायची, परंतु आता जुन्या अभिनेत्री सक्षम असतील, तर त्यांना आव्हानात्मक भूमिका मिळू शकतात. यात हार-जीतचा सवाल नाही. अर्थात यासाठी तुम्ही आजही लाईमलाईटमध्ये राहू शकता, असा आत्मविश्वास असायला हवा. पूर्वीच्या काळातच जगत बसलात, तर तुम्ही संपून जाईल, अशी अनेक उदाहरणे माझ्यासमोर आहेत. माझ्या मते, ताकदीच्या अभिनेत्रीला वयाची मर्यादा नसते.तुम्ही महिलाविषयक कामात स्वत: झोकून दिले आहे, त्याबद्दल काय सांगाल?-राजस्थानातील एका लहानशा खेड्यातील महिलांसाठी सध्या मी काम करते आहे. त्यांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित समस्यांवर उत्तर शोधण्याचे माझे प्रयत्न आहेत.  देशभरातील वेगवेगळ्या भागांत राहणाºया महिलांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागतेय. त्यांच्या समस्या,प्रश्न याबाबत सरकार उदासीन आहे. महिलांच्या या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचे माझे प्रयत्न आहे. अनेक अभिनेते सामाजिक कार्यात हिरीहिरीने सहभाग घेत आहेत, याचा आनंद आहे.पूर्वी आणि आताच्या सिनेमात काय फरक जाणवतो?- काही वर्षांपूर्वी अभिनेत्रींना त्याच त्या, ठराविक साच्यातल्या भूमिका मिळत होत्या. पण आता हे सगळे बदलू लागले आहे. अभिनेत्रींच्या वाट्यालाही अनेक आव्हानात्मक भूमिका येऊ लागल्या आहेत. अभिनेत्रींच्या वयाचा मुद्दाही आता बाजूला पडला आहे. टीव्ही मालिका ‘अम्मा’मध्ये मी झीनतची मध्यवर्ती भूमिका साकारते आहे, हे त्याचे प्रतीकात्मक उदाहरण म्हणता येईल. तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट बदलला आहे. मात्र, त्याच वेळी काही बाजू कमकुवतही होत चालल्या आहेत. पूर्वी तंत्रज्ञानाच्या बाबतीत चित्रपट कमकुवत असायचा, पण कथानक  सशक्त होते. मात्र, आज दमदार कथानकांचा अभाव आहे. माझ्या मते, यावर भक्कमपणे काम करणे गरजेचे आहे. एनएफडीसी तसा प्रयोग करते आहे, हे चांगले आहे. चित्रपटातील कलाकारांना खूप सहज प्रसिद्धी मिळते आहे का?- सध्याचा चित्रपट उद्योग आव्हानात्मक आहे. तितकाच तो सवंगही बनला आहे. आधी एखादाच एका रात्रीत स्टार व्हायचा, पण आज रोज एक नवा स्टार जन्माला येतोय. त्याला तितकीच प्रसिद्धीही मिळतेय. मुख्य प्रवाहातील सिनेमा अभिनयाच्या आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने उत्तम बनतो आहे, पण तो उथळही होत चालला आहे. कथानकाच्या अभावामुळे नावीन्यपूर्ण चित्रपट, आशयघन चित्रपट अलीकडे पाहायला मिळत नाहीत.सध्या कुठल्या प्रोजेक्टवर काम करत आहात?- अपर्णा सेन यांच्या ‘सोनाटा’ या चित्रपटात मी दोन गाणी गायिली आहेत. हा एक वेगळा अनुभव होता. येत्या वर्षात एका अमेरिकन आणि इंग्लिश चित्रपटांसाठी आपण काम करणार आहे. शिवाय मुन्शी प्रेमचंद यांच्या कादंबरीवर आधारित ‘ईदगाह’ हा लघुपट मी केला आहे. त्याच्याच प्रमोशनसाठी मी गोव्यात आले आहे. पियूष पंजवानी यांनी हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. ही एक नातेसंबंधावर आधारित कथा आहे. आजी आणि नातीच्या भावनात्मक कथेवर या लघुपटात मी अमिनाबीची भूमिका केली आहे. मालिकेत काम करण्याचा अनुभव कसा आहे?- चित्रपट हे दिग्दर्शकाचे, नाटक हे अभिनेत्याचे, तसेच मालिका हे लेखकांचे माध्यम आहे. मालिकेत काम हा एक वेगळाच अनुभव मिळाला. अनिलकपूरसोबत ‘24’ या मालिकेतील अनुभव यासाठी कामी आला. अर्थात ‘अम्मा’ ही मालिका पूर्ण लांबीची आहे. त्यामुळे त्यातील माझी भूमिकाही प्रदीर्घ आहे. इथे रोज तुम्हाला कमिटमेंट करावी लागते. इथली व्यवस्थाही टीआरपीवर अवलंबून  आहे. या नव्या आव्हानाला सामोरे जाण्याचा माझा प्रयत्न आहे. चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीबद्दल सांगा?- चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीबद्दल कोणालाच काही वाटत नाही, हा खेदजनक अनुभव आहे. अवघ्या पाच लाख रुपयांत कुणी चित्रपट बनवेल काय? 25 लाख रुपयांचे बजेट असताना मुलांसाठीचे चित्रपट काढणे हा स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेण्याची गोष्ट आहे. फिल्म बाजाराबद्दल काय वाटते?- एनएफडीसीच्या फिल्म बाजार हा नव्या चित्रपट व्यावसायिकांसाठी प्रेरणादायी आहे. हे एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. नवोदित निर्माते आणि दिग्दर्शकांसाठी अनेक संधी येथे उपलब्ध आहेत. यापूर्वी मी वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात फिरत होते; परंतु तेथे फक्त चित्रपट पाहणेच व्हायचे. इथे मात्र तुम्ही तुमचे करिअर घडवू शकता. नवीन निर्माते, नवीन दिग्दर्शक नवे विषय, आव्हानात्मक भूमिका घेऊन येत असतात.