पद्मावतीसाठी लागतोय ‘शीशमहल’चा सेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:36 IST
संजय लीला भन्साळी याच्या चित्रपटात रोमांस व भव्य सेट हे समीकरणच झाले आहे. हम दिल दे चुके सनम पासून ...
पद्मावतीसाठी लागतोय ‘शीशमहल’चा सेट
संजय लीला भन्साळी याच्या चित्रपटात रोमांस व भव्य सेट हे समीकरणच झाले आहे. हम दिल दे चुके सनम पासून ते आताच्या बाजीराव मस्तानीपर्यंत संजयने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात भव्य सेट्स दिसले आहेत. आता ‘पद्मावती’साठी शीशमहलचा सेट निर्माण केला जात असल्याची माहिती आहे. संजय लीला भन्साळीचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ची सध्या चांगलीच चर्चा रंगते आहे. भन्साळी या चित्रपटासाठी ‘शीशमहल’ तयार करीत आहे. या सेटचे काम मुंबईतील प्रसिद्ध महबूब स्टुडीओमध्ये लावण्यात येत आहे. विशेष म्हणजे या ‘शीशमहल’मध्ये एकही लाईट लावण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येते. पद्मावती चित्तोडची महाराणी पद्मीनी हिची कथा असल्याचे मानले जात आहे. राजपूत राजांचे वैभव दर्शविण्यासाठी हा शीशमहल निर्माण केला जात असल्याचे सांगण्यात येते. संजय लीला भन्साळीच्या चित्रपटामध्ये भव्य सेट ही विशेषता असते. ‘पद्मावती’चा सेट ज्या स्टुडिओमध्ये लावण्यात येत आहे त्याला मागील 55 दिवसांपासून भन्साळी यांनी भाड्याने घेतले आहे. या स्टुडिओचे दिवसाचे भाडे 1 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. सूत्रांच्या मते येत्या 21 आॅक्टोंबरपासून पद्मावतीच्या शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे. असे असले तरी भन्साळी यांच्या समोरील अडचणी कमी झालेल्या नाहीत. रणवीरचा अवाजवी हस्तक्षेपावरून चित्रपटात काम न करण्याचा दम शाहीदने दिला आहे. यावर निर्मार्त्यांनी खुलासा जारी केला असून तो यात काम करेल असे सांगितले आहे. मात्र सहनिर्माता कंपनी इरोस इंटरनॅशनलने या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला असल्याचे सांगण्यात येते. एकाही दिवसाची शूटिंग झाली नसताना संजय लीला भन्साळी यांनी सुमारे 70 लाख खर्च केल्याने इरोजला हा प्रोजेक्ट आपल्याला महागात पडू शकतो असे वाटू लागले आहे. दुसरीकडे रणवीर सिंग त्याचा आगामी चित्रपट बेफ्रिकेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होणार असल्याचे सांगण्यात येते. तर दीपिका देखील तिचा आगामी हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्स : द रिर्टन आॅफ झेंडर केज’ व्यस्त राहील. शाहीद कपूर देखील रंगूनच्या प्रमोशनात व्यस्त होऊ शकतो. पत्नी मीरा व मुलगी मीशा यांच्यासोबत सध्या शाहीद सुट्या एन्जॉय करीत आहे.