सारा अली खान पोहोचली ‘केदारनाथ’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2017 16:50 IST
गेल्या काही दिवसांपासून सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची जोरदार ...
सारा अली खान पोहोचली ‘केदारनाथ’!
गेल्या काही दिवसांपासून सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. आता तिच्या डेब्यूची बातमी कन्फर्म झाली असून, ती सध्या केदारनाथ येथे चित्रपटाच्या टीमसोबत पोहोचली आहे. होय, टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक अभिषेक कपूर, सारा अली खान आणि ‘केदारनाथ’ या चित्रपटाची संपूर्ण टीम उत्तराखंड येथे पोहोचली आहे. जिथे सारासह टीमने केदारनाथ मंदिर येथे सकाळीच आरती केली. यावेळी संपूर्ण टीम भक्तिमय वातावरणात दंग झाल्याचे दिसून आले. चित्रपटाची टीम २२ किलोमीटरची पदयात्रा करून केदारनाथच्या मंदिरात पोहोचली होती. ‘केदारनाथ’ या चित्रपटाची कथा एक लव्ह स्टोरी आहे. चित्रपटात सारा अली खान हिच्याबरोबर सुशांतसिंग राजपूत मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे. वास्तविक अभिषेक यांच्या ‘काई पो छे’मध्ये सुशांतने यापूर्वी काम केले आहे. त्यामुळे ही जोडी पुन्हा ‘केदारनाथ’निमित्त एकत्र येत आहे. असो, आता असे म्हटले जात आहे की, यावर्षीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. सारा बॉलिवूडमध्ये केव्हा डेब्यू करणार याविषयी चर्चा रंगत होती. काही दिवसांपूर्वीच सारा आणि तिची आई अमृता सिंग अभिनेता सुशांत आणि अभिषेक यांची भेट घेताना दिसले होते. या विशेष भेटीनंतर दोघीही खूपच आनंदी दिसत होत्या. जेव्हा सुशांतने पीटीआयशी चर्चा केली होती, तेव्हा त्याने सांगितले होते की, आम्ही आतापर्यंत कुठलाच चित्रपट साइन केला नाही. त्यामुळे मी लगेचच याविषयी काहीही सांगू शकत नाही. सुरुवातीला अशा बातम्या समोर आल्या होत्या की, सारा लवकरच करण जौहर याच्या आगामी ‘स्टूडेंट आॅफ द ईयर २’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणार आहे. तिची सावत्र आई म्हणजेच करिना कपूर-खान हीदेखील तिच्या डेब्यूसाठी प्रयत्नशील होती. मात्र आता करणच्या चित्रपटातून डेब्यूची चर्चा धुसर दिसत आहे. जर तिने करणच्या चित्रपटातून डेब्यू केला असता तर तिला टायगर श्रॉफसोबत काम करायला मिळाले असते. या चित्रपटात टायगर लीड रोलमध्ये बघावयास मिळणार आहे. सारा स्टार किड्स असल्याने सोशल मीडियावर खूपच चर्चेत असते. तिच्या फॅन क्लबची संख्या प्रचंड आहे.