Join us  

कंगनापाठोपाठ मुंबई पोलिसांवर बरसली सपना भवनानी; म्हणाली, आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 1:28 PM

 कंगनाला पाठींबा देतानाच सपनाने मुंबई पोलिसांना लक्ष्य केले आहे.

ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूवर उघडपणे बोलणा-या कंगनाने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणारे वक्तव्य केले होते.

अभिनेत्री कंगना राणौतचा शिवसेना आणि मुंबई पोलिसांवर हल्लाबोल सुरु आहे. तूर्तास कंगना व शिवसेना यांच्यातील वाद टीपेला पोहोचला आहे. अशात बॉलिवूड मात्र दोन गटात विभागले गेले आहे. बॉलिवूडचा एक गट कंगनाच्या विरोधात आहे तर एक गट खुलेआम कंगनाचे समर्थन करतोय. अशात बिग बॉसची माजी स्पर्धक आणि हेअर स्टायलिस्ट सपना भवनानी हिने कंगनाला पाठींबा दिला आहे. कंगनाला पाठींबा देतानाच सपनाने मुंबई पोलिसांना लक्ष्य केले आहे.

लोक मुंबई पोलिसांकडे जाऊ इच्छित नाही...

‘कमालीचा कोडगेपणा, मदतीसाठी तत्पर नसणे आणि सरतेशेवटी काहीही न करणे यामुळे मुंबई पोलिसांबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून मी कंगना राणौतच्या सोबत आहे. तुम्ही डीसीपीसोबत बोललात तरीही काहीही कारवाई होत नाही. जोपर्यंत कोणाचा मृत्यू होत नाही, तोपर्यंत सगळेच ढिम्म. आम्हाला हे होऊ नये यासाठी मदत हवी नाही, कुठली दुर्घटना होईल आणि मग मदत मिळेल, असे नकोय. मला आत्ताही कारवाईची प्रतीक्षा आहे, असे एक ट्विट सपनाने केले.

पुढच्या ट्विटमध्ये तिने लिहिले, ‘ मुंबई पोलिसांकडे गेल्यानंतर फायदा झाला अशा पाच मित्रांची नावं मी सांगू शकत नाही. हे प्रचंड दुर्दैवी आहे. तुम्ही मुंबईच्या नागरिकांसाठी काम करता, हे कदाचित ते विसरले आहेत आणि आता त्यांची बाजू घेण्याची अजिबात गरज नाही. एक नागरिक या नात्याने आपल्याला सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत. कारण प्रश्न विचारणे हा नागरिकांचा हक्क आहे. आमच्यासाठी काम करत असाल तर उपकार करत नाही़’ लोक मुंबई पोलिसांकडे जाऊ इच्छित नाही, असेही सपनाने म्हटले आहे.

काय म्हणाली होती कंगना?सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूवर उघडपणे बोलणा-या कंगनाने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणारे वक्तव्य केले होते. ‘मला गुंड, माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची अधिक भीती वाटू लागलीय. मुंबईत मला हिमाचल प्रदेश किंवा थेट केंद्र सरकारची सुरक्षा हवी. मुंबई पोलिसांची नको,’ असे ट्विट तिने केले होते.मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणारे ट्विट केल्यानंतर  कंगनावर राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून टीकेची झोड उठली होती. कंगनाला मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर तिने आपल्या राज्यात निघून जावे, असा इशारा शिवसेना, मनसेने यानंतर दिला होता. एवढेच नाही तर कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते. अनेक सेलिब्रिटींनी थेट तिच्यावर टीका न करता ‘मुंबई मेरी जान’ म्हणत कंगनाला अप्रत्यक्षपणे तिच्या चुकीची जाणीव करून दिली होती.

मुंबईची POK सोबत तुलना केल्यानं कंगना राणौत ट्रोल; बॉलिवूड कलाकारापासून नेटिझन्सही संतापले

एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वत: प्रकाशझोतात राहायचं हा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न; मनसेनं फटकारलं

टॅग्स :कंगना राणौत