सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर वेगवेगळे आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. काहींच्या मते, सुशांतने डिप्रेशनमुळे स्वत:ला संपवले तर काहींच्या मते, तो बॉलिवूडमधील नेपोटिझमचा बळी ठरला. याच पार्श्वभूमीवर बिहारमध्ये सलमान खान, करण जोहर, संजय लीला भन्साळी, एकता कपूर यांसारख्या मोठ्या बॉलिवूड सेलिब्रेटींच्या विरोधात सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. काल एकता कपूरने या तक्रारीवर आपली प्रतिक्रिया दिली होती. आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, संजय लीला भन्साळींनी एक-दोन नाही तर आपल्या 4 प्रोजेक्टमध्ये सुशांतला घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही कारणास्तव हे शक्य झाले नाही. हे चार सिनेमे कोणते, हे मात्र भन्साळींनी स्पष्ट केलेले नाही़.वृत्तानुसार, सुशांत व भन्साळींचे संबंध कधीच वाईट नव्हते़. दोघांमध्येही चांगले संबंध होते. दोघांनी एकत्र काम करण्यासाठी प्रयत्न केले होते. पण वेगवेगळ्या कारणांमुळे दोघेही एकत्र काम करू शकले नाहीत. तुम्हाला आठवत असेलच की, संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’वरून वाद झाल्यावर सुशांत भन्साळींच्या बाजूने उभा झाला होता. भन्साळींच्या सेटवर हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ सुशांतने सोशल मीडियावर त्याने स्वत:चे ‘राजपूत’ हे सरनेम हटवले होते.सुशांतच्या मृत्यूमुळे भन्साळी आधीच दु:खी होते. आता त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याने ते आणखी दु:खी असल्याचे कळतेय.