Join us  

माझ्या लेकीसाठी ‘धर्मा’पेक्षा बेस्ट काहीही नाही...! संजय कपूरला करण जोहरचा पुळका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 10:59 AM

करण जोहरने सोमवारी संजय कपूरची लेक शनाया कपूर हिला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याची घोषणा केली. यानंतर काय तर, सोशल मीडिया युजर्सनी करणला जबरदस्त ट्रोल केले. अशावेळी संजय कपूर करणच्या बाजूने मैदानात उतरला.

ठळक मुद्देशनायाने धर्मा प्रॉडक्शनच्या ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ या सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते.

स्टारकिड्सला लॉन्च करणारा दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने सोमवारी अभिनेता संजय कपूरची लेक शनाया कपूर हिला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याची घोषणा केली. यानंतर काय तर, सोशल मीडिया युजर्सनी करणला जबरदस्त ट्रोल केले. बॉलिवूडच्या घराणेशाहीवरून युजर्सनी करणवर निशाणा साधला. अशावेळी संजय कपूर करणच्या बाजूने मैदानात उतरला. शनायाच्या लॉन्चसाठी धर्मा प्रॉडक्शनशिवाय बेस्ट काहीही नाही, असे संजय कपूरने अगदी ठासून सांगितले.

ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत संजय कपूरला लेकीच्या अ‍ॅक्टिंग डेब्यूबद्दल विचारण्यात आले. यावर एक वडील म्हणून मी खूप खूश आहे. माझी मुलगी शनाया अ‍ॅक्टिंग डेब्यू करतेय, हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे, असे तो म्हणाला. शनायाच्या लॉन्चिंगसाठी धर्मा प्रॉडक्शनच का? असे विचारले असता तो म्हणाला, ‘करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन अनेक स्टारकिड्ससाठी लॉन्च पॅड राहिले आहे आणि आता शनाया या कंपूत सामील झाली आहे. शनाया कपूरसाठी धर्मा प्रॉडक्शनशिवाय बेस्ट दुसरे काहीही असू शकत नाही.’

शनाया कपूरच्या बॉलिवूड डेब्यूत तुझे योगदान किती? असे विचारले असता, यात माझे काहीही योगदान नाही. शनायाने खूप मेहनत केलीय आणि तिचा ग्रॅण्ड लॉन्च व्हावा, अशी माझी इच्छा होती. तो तिचा अधिकार आहे, असे संजय कपूर म्हणाले.शनायाने धर्मा प्रॉडक्शनच्या ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ या सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. शरन शर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात जान्हवी कपूर, पंकज त्रिपाठी, अंगद बेदी महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.

टॅग्स :शनाया कपूरसंजय कपूरकरण जोहर