Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तला शिक्षा सुनावणारे न्यायाधीश पीडी कोडे यांच्याशी होणार संजूबाबाचा आमना-सामना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 21:46 IST

बॉम्बस्फोटानंतर मुंबईत पेटलेल्या दंगलीत बेकायदेशीररीत्या घरात एके-५६ रायफल ठेवल्याच्या आरोपांतर्गत संजय दत्तलाही त्यांनी दोषी ठरविले होते. या प्रकरणी त्यांनी संजूबाबाला सहा वर्षांची शिक्षा सुनावली.

अभिनेता संजय दत्त याला सहा वर्षांची शिक्षा सुनावणारे निवृत्त न्यायाधीश पीडी कोडे यांचा ‘जेडी’ हा चित्रपट संजूबाबाच्या ‘भूमी’ या चित्रपटाबरोबरच रिलीज होणार आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर संजय दत्त ‘भूमी’मधून कमबॅक करीत आहे. तर न्यायाधीश कोडेदेखील निर्माता-दिग्दर्शक शैलेंद्र पांडे यांच्या ‘जेडी’ या चित्रपटात एका न्यायाधीशाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. हे दोन्ही चित्रपट २२ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहेत. आता बॉक्स आॅफिसवर या चित्रपटांचा कसा मुकाबला होईल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. न्यायाधीश कोडे यांनी २००६-०७ मध्ये मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी टाडा न्यायालयांतर्गत ऐतिहासिक निकाल दिले होते. या प्रकरणात शंभरपेक्षा अधिकांना दोषी तर डझनभर आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. बॉम्बस्फोटानंतर मुंबईत पेटलेल्या दंगलीत बेकायदेशीररीत्या घरात एके-५६ रायफल ठेवल्याच्या आरोपांतर्गत संजय दत्तलाही त्यांनी दोषी ठरविले होते. या प्रकरणी त्यांनी संजूबाबाला सहा वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायाधीश कोडे यांनी संजय दत्तला शिक्षा सुनावताना म्हटले होते की, ‘तू शंभर वर्षांपर्यंत अभिनय कर, मी तुझ्या आयुष्यातील फक्त सहा वर्ष घेतले आहेत.’आता हे दोघेही नवी इनिंग सुरू करीत असून, योगायोगाने त्यांना पहिल्याच सामन्यात आमने-सामने उभे राहावे लागले आहे. कारण शिक्षा भोगून आल्यानंतर संजूबाबा ‘भूमी’मधून कमबॅक करीत आहे. तर न्यायाधीश कोडे ‘जेडी’ या चित्रपटातून पहिल्यांदाच अभिनय करीत आहेत. फोटो जर्नालिस्ट शैलेंद्र पांडेच्या या चित्रपटाची शूटिंग न्यायाधीश कोडे यांनी २०१५ मध्ये गोरेगाव फिल्म सिटी येथे केली होती. ‘जेडी’ या चित्रपटात जय द्विवेदी (ललित बिष्ट) नावाच्या पत्रकाराची कथा आहे. शैलेंद्र पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जेडीला अंडरवर्ल्डच्या लोकांनी गोळ्या झाडून ठार केले होते. चित्रपटात न्यायाधीश कोडे ‘जेडी’ प्रकरणावर निकाल देताना बघावयास मिळणार आहेत. जेडीच्या वकिलांच्या भूमिकेत अमन वर्मा बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाचा थेट संजूबाबाच्या ‘भूमी’शी सामना होणार असल्याने बॉक्स आॅफिसवर कोण तग धरणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.