Join us

​संजय दत्त आणि अर्शद वारसीच्या मुन्नाभाईचा तिसरा भाग लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 14:56 IST

मुन्नाभाई एम.बी.बी.एस आणि लगे रहो मुन्नाभाई या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटातील संजय ...

मुन्नाभाई एम.बी.बी.एस आणि लगे रहो मुन्नाभाई या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटातील संजय दत्त आणि अर्शद वारसीच्या अभिनयाचे सगळ्यांनी कौतुक केले होते. या चित्रपटातील संजय आणि अर्शदची केमिस्ट्री खूपच गाजली होती. मुन्ना आणि सर्किट ही नवी जोडी या चित्रपटामुळे बॉलिवुडला मिळाली होती.मुन्नाभाई एम.बी.बी.एस या चित्रपटाच्या काही वर्षं आधीच संजय दत्त जेलमधून सुटून आला होता. जेलमधून आल्यानंतर त्याने वास्तव हा सुपरहिट चित्रपट दिला पण मुन्नाभाई एम.बी.बी.एस हा त्याचा खऱ्या अर्थाने कमबॅक ठरला. या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळा संजय पाहायला मिळाला. या चित्रपटासाठी त्याला अनेक पुरस्कारदेखील मिळालेत. मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाच्या यशानंतर लगे रहो मुन्नाभाई हा त्याचा सिक्वल प्रेक्षकांच्या काहीच वर्षांत भेटीस आला. लगे रहो मुन्नाभाई हा चित्रपट हिट ठरल्यानंतर मुन्नाभाई चले अमेरिका या चित्रपटाची लगेचच घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाच्या पटकथेवर काम देखील झाले होते आणि या चित्रपटाचा ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. पण पुढे या चित्रपटाची कथा दिग्दर्शक-निर्मात्यांना तितकीशी न आवडल्याने या चित्रपटाचे काम रखडले. पण आता लवकरच मुन्नाभाईचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे. संजय दत्तच्या बायोपिकवर सध्या राजकुमार हिरानी काम करत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर संजय दत्तच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटानंतर राजकुमार हिरानी मुन्नाभाई 3 वर काम करणार आहेत. तीन-चार वर्षांपूर्वीदेखील पुन्हा या चित्रपटाच्या सिक्ववर काम सुरू झाले होते. पण त्यावेळी संजय दत्तला तुरुंगात जावे लागले असल्याने त्यावेळीदेखील या चित्रपटाचा बेत रद्द झाला. सध्या या चित्रपटावर अभिजात जोशी काम करत असल्याचे म्हटले जात आहे. अभिजातने लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटाची कथा लिहिली होती. या चित्रपटाच्या सिक्वलमध्येदेखील संजय दत्त आणि अर्शद वारसीच प्रमुख भूमिका साकारणार असून संजयच्या वयाला साजेशी अशी भूमिका लिहिली जात असल्याची चर्चा आहे.