Join us  

भारतातील एका राज्यात या कारणामुळे प्रदर्शित होणार नाही सलमान खानचा भारत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 11:47 AM

भारत हा चित्रपट भारतातील या राज्यात 5 जूनला प्रदर्शित न होण्यामागे एक खास कारण आहे.

ठळक मुद्देछत्तीसगडमधील मल्टीप्लेक्समध्ये छत्तीसगडमधील भाषेतील चित्रपटांना प्राधान्य दिले जात नाहीये या मुद्द्यावर शांततेत धरणा आंदोलन करून 5 जूनला एक दिवस मल्टीप्लेक्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून सलमान खानचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. सलमान देखील या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची एकही संधी सोडत नाही. सलमानचा हा चित्रपट 5 जूनला प्रदर्शित होणार असून या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, छत्तीसगडमधील सलमानच्या फॅन्सना त्याचा चित्रपट पहिल्या दिवशी पाहायला मिळणार नाहीये अशी चर्चा रंगली आहे. सलमानचा चित्रपट 5 जूनला छत्तीसगडमध्ये प्रदर्शित होत नसल्याने त्याच्या चाहत्यांची चांगलीच निराशा होणार आहे.

छत्तीसगडमध्ये भारत हा चित्रपट 5 जूनला प्रदर्शित न होण्यामागे एक खास कारण आहे. पत्रिका या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, छत्तीसगडमधील मल्टीप्लेक्समध्ये छत्तीसगडमधील भाषेतील चित्रपटांना प्राधान्य दिले जात नाहीये या मुद्द्यावर शांततेत धरणा आंदोलन करून 5 जूनला एक दिवस मल्टीप्लेक्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

छत्तीसगड चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचे म्हणणे आहे की, मल्टीप्लेक्समध्ये हॉलिवूड, बॉलिवूड चित्रपटांना स्थान मिळते. पण छत्तीसगड भाषेतील चित्रपटांना मल्टीप्लेक्स मिळत नाही. त्यामुळे सगळे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार आणि तंत्रज्ञ यांनी एकत्र मिळून हे आंदोलन करण्याचे ठरवले आहे. 

मल्टीप्लेक्सचे मालक आणि छत्तीसगड चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ यांच्यात सध्या छत्तीसगड भाषेतील चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये प्राधान्य देण्याविषयी चर्चा सुरू आहे. त्यामुळे चर्चेतून तोडगा निघाल्यास हा बंद मागे घेण्यात येईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता सलमानचा भारत छत्तीसगडमध्ये प्रदर्शित होतो की नाही हे लवकरच कळेल. 

भारत या चित्रपटात सलमान वेगवेगळ्या पाच लुकमध्ये दिसणार असून या सगळ्याच लूकची चर्चा सध्या रंगली आहे. या चित्रपटातील सगळे लूक परफेक्ट असावेत यासाठी स्वतः सलमानने बारकाईने लक्ष दिले आहे. त्याने अनेक लुक्स ट्राय केल्यानंतर या चित्रपटांमधील सगळ्या लूकची निवड केली आहे. 

भारत या चित्रपटात सलमान खान आणि कतरीना कैफसोबत जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत. ईदच्या मुहूर्तावर 'भारत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.

टॅग्स :भारत सिनेमासलमान खानकतरिना कैफ