बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) मध्यंतरी चांगलाच चिंतेत होता. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून त्याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्याच्या गॅलक्सी अपार्टमेंटवर तर पहाटे गोळीबारही झाला होता. यामुळे सलमानच्या सुरक्षेत वाढ करत त्याला वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली होती. इतकी सुरक्षा असतानाही नुकतंच सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये एक अज्ञात व्यक्ती घुसल्याची घटना घडली आहे.
२० मे रोजी एका अज्ञात व्यक्तीने सलमान खानच्या अपार्टमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. सुरक्षारक्षकांनी वेळीच पकडत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. तर काल रात्री एका महिलेनेही सलमानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला.आज सकाळीच मुंबई पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.
नक्की काय घडलं?
सर्वात आधी मंगळवारी एका व्यक्तीने सुरक्षारक्षकांना चकमा देत घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. कारच्या मागे लपून तो सलमानच्या इमारतीत घुसला. तेवढ्यात सुरक्षारक्षकांनी त्याला एन्ट्री गेटपाशी पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. जितेंद्र कुमार सिंह असं त्या व्यक्तीचं नाव होतं जो छत्तीसगढचा होता. याशिवाय ईशा छाबडा नावाच्या एका महिलेने आज पहाटे ३.३० वाजता सलमानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. ती लिफ्टमधून सरळ सलमानच्या फ्लॅटपर्यंत पोहोचली. वरती असलेल्या सुरक्षारक्षकांनी तिला पकडलं.
मुंबई पोलिसांनी या दोन्ही घटना कन्फर्म केल्या आहेत. याआधी गेल्या वर्षी १४ एप्रिल रोजी सलमानच्या घरावर फायरिंग झाली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी ७ जणांना अटक केली होती.