जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. या दरम्यान सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. सध्या सेलिब्रेटी आपापल्या घरात असून सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत आहेत. सलमान खान पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊसमध्ये त्याच्या कुटुंबियांसोबत आहे. सलमान सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असून तो त्याच्या फार्म हाऊसमधील विविध फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.
सलमान सोशल मीडियावर विविध व्हिडिओ शेअर करत लोकांमध्ये कोरोना व्हायरसबाबात जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आता तर त्याने चक्क कोरोना व्हायरसवर एक गाणे बनवले असून हे गाणे लवकरच लोकांच्या भेटीस येणार आहे. सलमानने या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट केला असून प्यार करोना असे या गाण्याचे बोल असून थोड्याच वेळात सलमान संपूर्ण गाणे सोशल मीडियावर शेअर करणार आहे. त्याने या व्हिडिओसोबत लिहिले होते की, माझ्या युट्यूब चॅनलवर लोकांना हे गाणे पाहायला मिळणार असून हे गाणे सगळ्यांना आवडेल अशी मला आशा आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाले आहे. काहीच तासांत १८ लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.
या गाण्याचे वैशिष्ट्यं म्हणजे हे गाणे सलमान खान आणि हुसैन दलाल यांनी मिळून लिहिले आहे तर साजिद नाडियाडवालाने या गाण्याला संगीत दिले आहे. तसेच हे गाणे सलमानने त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर शूट केले आहे.