अशी झाली फिल्मी करिअरची सुरुवात...
इंदर कुमारने त्याच्या करिअरची सुरुवात १९९६ मध्ये ‘मासूम’ या चित्रपटातून केली होती. मात्र दुर्दैवाने हा चित्रपट फ्लॉप ठरल्याने त्याचा त्याच्या करिअरला काहीच फायदा झाला नाही. वास्तविक इंदरला सुपरस्टार म्हणून इमेज तयार करायची होती, परंतु मुख्य अभिनेता म्हणून त्याला फारसे पसंत केले गेले नसल्याने त्याने सहायक अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. इंडस्ट्रीत ओळख निर्माण करण्यासाठी अनेक वर्ष त्याची धडपड सुरू होती. चित्रपटही त्याला मिळत होते, परंतु सहायक अभिनेता म्हणूनच त्याच्या वाट्याला भूमिका येत गेल्या.
मधल्या काळात तर त्याचे चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल फ्लॉप ठरू लागले. त्यामुळे त्याने छोट्या पडद्यावर नशीब आजमाविले. ‘सास भी कभी बहू थी’ या प्रसिद्ध मालिकेत त्याने मिहीर विरानीची मुख्य भूमिका साकारली होती. मात्र अशातही यश त्याच्यापासून दूरच राहत गेले. वर्षानुवर्ष मेहनत घेतल्यानंतरही यश मिळू न लागल्याने तो नशेच्या आहारी गेला. याबाबतचा खुलासा त्याची पत्नी पल्लवी हिने एका मुलाखतीदरम्यान केला होता. दारूच्या नशेत इंदर असा काही गुरफटत गेला की, त्याला दुसरे काहीच सुचत नव्हते. अशात बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांनी त्याला मदत केली. सलमानने इंदरला दारूच्या नशेपासून दूर नेण्यासाठी बरेच प्रयत्न केले. ऐवढेच नव्हे तर सलमानने इंदरला चित्रपटांमध्ये संधी मिळवून दिल्या.
इंदरने सलमानसोबत ‘तुमको ना भूल पाएंगे’, ‘कहीं प्यार ना हो जाए’ आणि ‘वॉन्टेड’ या चित्रपटांमध्ये काम केले. या तिन्ही चित्रपटांत इंदरच्या भूमिका सुपरहिट ठरल्या. समिक्षकांनी त्याच्या भूमिकेचे कौतुक केले. ‘वॉन्टेड’मुळे तर त्याच्या करिअरलाच ब्रेक मिळाला. या चित्रपटात इंदर सलमानच्या भावाच्या भूमिकेत बघावयास मिळाला. हळूहळू इंदरकुमार लाइमलाइटमध्ये येत गेला. चित्रपटसृष्टीत त्याच्या नावाची चर्चा होऊ लागली. तो नेहमी सलमानसोबत बघावयास मिळत होता. सलमानसोबतच्या क्लोज कनेक्शनचा त्याला फायदा होत गेला.
जेव्हा इंदरकडे काम नव्हते तेव्हा सलमान इंदर आणि त्याच्या परिवारासाठी धावून गेला होता. आर्थिक स्वरूपाची मदतही सलमान त्याला करीत होता. शिवाय चित्रपटांमध्ये कामही मिळवून देत होता. ही बाब इंदरची पत्नी पल्लवीने एका मुलाखतीदरम्यान मान्यही केली होती. मात्र एका चुकीमुळे इंदरचे करिअर पुन्हा एकदा चुकीच्या वळणावर गेले. २०१४ मध्ये इंदरकुमार एका बलात्काराच्या गुन्ह्यात ओढला गेला. एका महिलेने त्याच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. इंदरने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.