बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कायमच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सलमानच्या लग्नाची गेल्या कित्येक वर्षांपासून चाहते वाट पाहत आहेत. पण, अद्याप भाईजान सिंगल आहे. सलमानचे अनेक अफेअर्स होते. मात्र यातील एकही यशस्वी झालं नाही. सलमाने नुकतंच एका शोमध्ये रिलेशनशिपच्या अपयशाबद्दल स्वत:ला दोषी मानलं आहे. त्याबरोबरच अभिनेत्याने त्याची एक सुप्त इच्छादेखील बोलून दाखवली आहे.
सलमानने ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या प्राइम व्हिडिओच्या नव्या शोमध्ये आमिर खानसोबत हजेरी लावली होती. या खास शोमध्ये आपल्या आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. ५९व्या वर्षी वडील होण्याची इच्छा सलमानने या शोमध्ये बोलून दाखवली. सलमान म्हणाला की, "माझ्या आयुष्यात मुलं असावीत अशी माझी खूप इच्छा आहे. मला आता बाबा व्हायचं आहे आणि मी लवकरच होईन". आमिरने रिलेशनशिपबद्दल विचारल्यावर सलमान म्हणाला, "आयुष्यात नाती जपणं आणि कुणाला प्रेम, आधार देणं महत्त्वाचं असतं. मला नातं जपता आलं नाही, त्याचा पुरेपूर दोष माझाच आहे"
सलमान खानने यापूर्वीही काही मुलाखतींमध्ये वडील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याने म्हटलं होतं की "कोणत्याही पद्धतीने, परंतु स्वत:चे मूल असण्याची तीव्र इच्छा आहे. मात्र, भारतीय सरोगसी कायद्यानुसार अविवाहित पुरुष सरोगसीद्वारे वडील होऊ शकत नाहीत. त्यामुळे हा मोठा अडथळा आहे". सलमान खानच्या या वक्तव्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.