यावर्षीच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात धक्कादायक प्रकार घडला. अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) घरात घुसलेल्या चोराने अभिनेत्यावर चाकूहल्ला केला. सहसा सेलिब्रिटींच्या घरी कडक सुरक्षा असताना अशा प्रकारे चोराने घुसणं आणि थेट हल्ला करणं धक्कादायकच होतं. सैफ अली खान हल्ल्यातून थोडक्यात वाचला. त्याची पत्नी करीना कपूर (Kareena Kapoor) तर प्रचंड घाबरली होती. सैफवरील हल्ल्यानंतर करीना कपूरचाही जीव धोक्यात होता असा खुलासा अभिनेता रोनित रॉयने (Ronit Roy) केला आहे.
हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत रोनित रॉय म्हणाला, "जे झालं ते सगळ्यांना माहितच आहे. सैफ रुग्णालयात होता. मी करीनाशी बोललो. त्यांच्या घरी गेलो. मी त्यांच्या घराच्या परिसराची रेकी केली. तिला काही छोट्या मोठ्या सूचना केल्या ज्या गरजेच्या होत्या. असं काहीतरी होऊ शकतं याचा विचारच केला नसल्याने त्यांच्या घरी सुरक्षेची कमतरता होती. आमचं तेच काम आहे जी कमतरता आहे ती आम्ही भरुन काढू."
तो पुढे म्हणाला, "सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मोठी गर्दी जमली होती. माध्यमांची गर्दी होती. मात्र त्याआधी सैफ रुग्णालयात असताना करीना जेव्हा रुग्णालयातून घरी येत होती तेव्हा तिच्या गाडीवर हल्ला झाला होता. ती खूप घाबरली होती. बरीच गर्दी असल्याने तिच्या गाडीलाही धक्का लागला होता. म्हणून तिनेच मला सैफला घरी घेऊन ये असं सांगितलं. मी सैफला घरी आणलं आणि त्याआधीच माझी सुरक्षा त्याच्या घरी तैनात केलीच होती. पोलिस सुरक्षाही होती."
रोनित रॉय अभिनेता तर आहेच मात्र त्याची स्वत:ची सिक्युरिटी एजन्सी आहे. बॉलिवूडमधील जवळपास प्रत्येक कलाकाराकडे रोनित रॉयची सिक्युरिटी आहे. सैफनेही हल्ला झाल्यानंतर रोनित कडेच सुरक्षेची जबाबदारी दिली होती.