Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवाजुद्दीन सिद्दीकीच साकारणार बाळासाहेब ठाकरेंची भूमिका, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 21:12 IST

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याला त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. मात्र गेल्या काळापासून तो त्याच्या आॅर्डिनरी लाइफमुळे चुकीच्या पद्धतीने ...

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याला त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. मात्र गेल्या काळापासून तो त्याच्या आॅर्डिनरी लाइफमुळे चुकीच्या पद्धतीने चर्चेत आला आहे. याचा परिणाम त्याच्या फिल्मी करिअरवर होतो की काय? अशी शंका उपस्थित केली जात होती. काही बातम्या तर अशाही समोर आल्या की, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटातून त्याची हकालपट्टी करण्यात आली. मात्र आता या बातम्यांवर पडदा टाकण्यात आला असून, नवाजच बाळासाहेबांची भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाची कथा स्वत: शिवसेना प्रवक्ता तथा खासदार संजय राउत यांनी लिहिली असून, बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजची निवड केली आहे. मिड डे रिपोर्टनुसार संजय राउत यांनी म्हटले की, नवाजुद्दीन सिद्दीकी अतिशय गुणवान अभिनेता आहे. बॉलिवूडमधील टॉप ५ अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव घेतल्यास चुकीचे ठरू नये. नवाजने थिएटरमध्ये काम केले आहे. त्यामुळे कोणती भूमिका कशी साकारावी हे तो खुबीने जाणतो. यावेळी जेव्हा संजय राउत यांना या भूमिकेसाठी मराठी अभिनेत्याचा विचार का केला नाही? एका मुस्लीम अभिनेत्याला कास्ट करण्याचे काय कारण? असे विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, शिवसेना किंवा बाळासाहेब केव्हाच मुस्लिमांच्या विरोधात नव्हते. आम्ही त्याच मुस्लिमांचा विरोध करतो जे पाकिस्तानचे समर्थन करतात. खरं तर नवाजला ही भूमिका त्याच्या गुणवत्तेनुसार मिळाली, त्याच्या धर्मावरून नव्हे. दरम्यान, काहीकाळापूर्वी अशा बातम्या समोर आल्या होत्या की, नवाजची या चित्रपटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नवाजुद्दीनचे वादग्रस्त पुस्तक समोर आल्यानंतर ज्या पद्धतीने त्याच्या रिअल लाइफचा उलगडा झाला त्यावरून त्याला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. मात्र आता या बातम्यांवर पूर्णविराम देण्यात आला असून, नवाजच ही भूमिका साकारणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आज (२१ डिसेंबर) शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या या बायोपिकचे लोकार्पण करण्यात आले. चित्रपटाची निर्मिती संजय राऊत करणार असून, त्यास अभिजित पानसे दिग्दर्शित करणार आहेत.