Ritesh Deshmukh: सध्या भारत पाकिस्तान या दोन्ही देशांंमध्ये तणावाची स्थिती आहे. या सर्व घडामोडींदरम्यान भारतीय सैन्यदलाचं मनोबल वाढवण्याचं काम देशातील प्रत्येक नागरिक करत आहे. गरज पडल्यास सैन्यात भरती होण्याचीही तयारी काही जणांनी दर्शवली आहे. जीवाची पर्वा न करता प्राणाची बाजी लावण्याची तयारी, देशसेवेची ही उर्जा फक्त तरुणांमध्ये नाही तर लहान मुलांमध्येही असल्याचं दिसलंय. नुकतंच अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. ज्या व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधलंय.
रितेश देशमुख हा सध्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित 'राजा शिवाजी' नावाचा चित्रपटच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या सेटवरचा एक खास व्हिडीओ रितेशने स्वतः आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये एका लहान मुलाशी तो संवाद साधताना पाहायला मिळाला. या व्हिडीओमध्ये रितेश एका छोट्याशा मुलाला विचारतो, "मला सांगा तुम्हाला मोठं झाल्यावर काय व्हायचंय?" या साध्या प्रश्नावर त्या मुलाने दिलेलं उत्तर ऐकून रितेश भारावल्याचं पाहायला मिळालं.
रितेशच्या प्रश्नावर त्या चिमुकल्याने उत्तर दिलं, "मला मोठं होऊन अभिनेता आणि आर्मी चीफ व्हायचंय, देशासाठी लढायचंय!" हे उत्तर ऐकून रितेश थक्क होतो आणि त्याला विचारतो, "अच्छा… मिलिटरी चीफ का व्हायचंय तुम्हाला?" तर चिमुकला म्हणतो, "कारण, मी भारतासाठी सर्वांचं संरक्षण करणार". पुढे रितेश म्हणतो, "संरक्षण करणार…वॉव छान! मला खरंच आवडलंय हे… तुम्ही आपल्या देशांचं चांगलं संरक्षण कराल का?" यावर चिमुकला "हो" असं म्हणतो. यानंतर रितेश त्याच कौतुक करत म्हणतो, "वाह… म्हणजे आमचं भविष्य तुमच्या हातात सेफ आहे". तर चिमुकला "हो, सर्वांचं भविष्य सेफ असेल", असं उत्तर देतो. व्हिडीओच्या शेवटी रितेश मुलाचा हात हात घेत म्हणतो, "थँक्यू! तुमचे खूप खूप आभार".
रितेश देशमुखने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलं, "आपलं भविष्य सेफ आहे #राजाशिवाजी". हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या मुलाच्या देशभक्तीचं आणि संस्कारांचं कौतुक करत कौतुकाची थाप दिली आहे. या मुलाचं नाव काय आहे, तो कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्याच्या एका साध्या पण सच्च्या उत्तराने देशभरातील लोकांचं मन जिंकलं आहे.