Join us

'हॅप्पी फिर भाग जायेगी'मधील 'मेरा नाम चिन चिन चु' गाणे प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 13:00 IST

१९५८ साली प्रदर्शित झालेला सिनेमा 'हावडा ब्रिज'मधील गाजलेले 'मेरा नाम चिन चिन चु' हे गाणे या चित्रपटात रिक्रिएट करण्यात आले आहे. 

ठळक मुद्दे 'मेरा नाम चिन चिन चु' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला 'मेरा नाम चिन चिन चु' गाण्याचे शूटिंग पार पडले चीनमध्ये

बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणजेच अभिेनेत्री सोनाक्षी सिन्हा 'हॅप्पी फिर भाग जायेगी' सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 'हॅप्पी भाग जायेगी' चित्रपटाचा सिक्वल आहे. या सिनेमातील 'मेरा नाम चिन चिन चु' हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याला स्वरसाज सोनाक्षीने दिला असून या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. १९५८ साली प्रदर्शित झालेला सिनेमा 'हावडा ब्रिज'मधील गाजलेले 'मेरा नाम चिन चिन चु' हे गाणे या चित्रपटात रिक्रिएट करण्यात आले आहे. 

'मेरा नाम चिन चिन चु' या रिक्रिएट केलेल्या गाण्यात सोनाक्षीसोबत पंजाबी गायक जस्सी गिलदेखील दिसतो आहे. हे गाणे सोहेल सेनने संगीतबद्ध केले आहे आणि गेल्या महिन्यात चीनमध्ये या गाण्याचे शूटिंग पार पडले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, ''मेरा नाम चिन चिन चु' या गाण्याला पंजाबी तडका देण्यात आला आहे आणि हे गाणे खूप छान बनले आहे. या गाण्यातून मला डबल ट्रीट मिळाली आहे. कारण हे गाणे माझ्यावर चित्रीत झाले आहे आणि मी गायलेदेखील आहे. ' 'मेरा नाम चिन चिन चु' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे हेलन यांना डेडिकेट करण्यात आले आहे. हेलन यांना अजिबात कॉपी केले नाही. उलट भारताच्या चित्रपटसृष्टीतील सुवर्ण काळातील हे गाणे मी खूप एन्जॉय केल्याचे सोनाक्षीने सांगितले. 'हॅप्पी भाग जायेगी' चित्रपटात अभिनेत्री डायना पेंटीने पंजाबी मुलगी हरप्रीत म्हणजे हॅप्पीची भूमिका केली होती आणि ती लग्नातून पळून जाऊन पाकिस्तानमध्ये पोहचलेली दाखवली होती. आता या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये सोनाक्षी हरप्रीतची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि ती चीनमध्ये पळून जाताना दिसणार आहे. 'हॅप्पी फिर भाग जायेगी' चित्रपट २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :सोनाक्षी सिन्हा