Join us

भाजपा आमदाराच्या चेहऱ्यावरील हास्य बघून रविना टंडनचा झाला संताप; म्हटले, ‘जणू काही मांजराला मलाई मिळाली’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 21:00 IST

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्यावर बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन चांगलीच संतापल्याचे दिसून ...

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्यावर बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन चांगलीच संतापल्याचे दिसून आले. कुलदीप सिंग सेंगर यांच्यावर निशाणा साधताना तिने ट्विट केले. या ट्विटमध्ये ती कुलदीप सेंगरवर चांगलाच संताप व्यक्त करताना दिसत आहे. त्याचे झाले असे की, बलात्काराच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या कुलदीप सिंग सेंगरशी संबंधित बातम्या सातत्याने माध्यमांमध्ये येत आहेत. लोकांचा आक्रोश पाहता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुलदीप सिंग सेंगरची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांना गेल्या सोमवारी कार्यालयात बोलाविले होते. त्यानुसार कुलदीप सेंगर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांच्या आॅफिसमध्येही पोहोचले. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींना कुलदीप सेंगर हसताना सामोरे गेले. याबाबतचे काही फोटो न्यूज एजन्सी एएनआयने त्यांच्या ट्विट अकाउंटवर शेअर केले. हे फोटो शेअर करताना ट्विटमध्ये लिहिले की, ‘आरोपी भाजपा आमदाराचे ताजे फोटो, ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचले.  मात्र हे ट्विट बघून रविनाचा चांगलाच संताप झाला. ट्विटमध्ये भाजपा आमदाराच्या चेहºयावरील हास्य बघून रविना अशी काही भडकली की तिने तिचा संताप ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला. रविनाने एएनआयच्या ट्विटला रिट्विट करताना लिहिले की, ‘पाहा, असे वाटत आहे की, मांजराला मलाई मिळाली. कमीत कमी आपल्यावर असलेल्या आरोपाची तरी लाज वाटायला हवी. ज्या पीडितेच्या वडिलांचा या प्रकरणी मृत्यू झाला त्यांची माफी मागितली असती.’ दरम्यान, उन्नाव येथील बंगरमऊ मतदारसंघाचे आमदारआणि त्यांच्या काही समर्थकांवर पीडित मुलीने जून २०१७ मध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पीडितेच्या आरोपानुसार, भाजपा आमदाराने तिला जबर मारहाण केली आहे. मात्र पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केल्यावरून संबंधित पीडितेच्या वडिलांनाच अटक केली होती. त्यानंतर कोठडीत त्यांचा मृत्यू झाला. सध्या या प्रकरणामुळे उत्तर प्रदेशात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.