Join us

श्वानप्रेमींवर भडकले राम गोपाल वर्मा, भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 15:44 IST

राम गोपाल वर्मा यांनी श्वानप्रेमींना सुनावलं आहे.

दिल्लीत भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यामुळं रेबीजची लागण होऊन एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्याची दखल घेतली. सक्त भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यावरून मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना डॉग शेल्टर होममध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर एकूणच या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला प्राणीप्रेमी आणि काही सेलिब्रिटींचा विरोध आहे. मात्र, त्या श्वानप्रेमींवर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा भडकले. 

राम गोपाल वर्मा यांनी श्वानप्रेमींना सुनावलं. भटक्या कुत्र्यांविषयी त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांनी ट्विट करत लिहलं, "अरे श्वानप्रेमींनो तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ओरडत आहात. पण, जेव्हा एका चार वर्षांच्या मुलाला रस्त्यावर निर्घृणपणे मारण्यात आले, तेव्हा तुम्ही कुठे होता? दरवर्षी हजारो लोकांवर हल्ला होतो. तुमची करुणा फक्त अशा लोकांसाठी राखीव आहे का ज्यांच्या शेपट्या हलत आहेत, मेलेल्या मुलांना काही महत्त्व नाही?", असा प्रश्न त्यांनी केला.

राम गोपाल पुढे म्हणाले, "कुत्र्यांना प्रेम करण्यात काही गैर नाही. मीही त्यांच्यावर प्रेम करतो. पण तुमच्या घरात, आलिशान बंगल्यात, सजवलेल्या लॉनमध्ये तुमच्या पाळीव प्राण्यांवर प्रेम करा. पण, सत्य हे आहे की तुमच्या भव्य व्हिलामध्ये कुत्र्यांचा धोका अस्तित्वात नाही. तो धोका रस्त्यांवर आणि झोपडपट्ट्यांमध्ये आहे. जिथे गरीब राहतो.  तो धोका अशा गल्लींमध्ये आहे, जिथे मुले अनवाणी खेळतात. जिथे कोणतेही दरवाजे किंवा कुंपण त्यांचे संरक्षण करत नाही. जेव्हा श्रीमंत त्यांच्या पाळीव प्राण्यांना गळ्यात घेतात, तेव्हा गरीब हे जखमींची काळजी घेतात आणि त्यांना आपल्या प्रियजणांना गमवावं लागतं".

पुढे त्यांनी लिहलं, "तुम्ही कुत्र्यांच्या हक्कांविषयी बोलता. ठीक आहे. पण मुलांच्या हक्कांचे काय? जगण्याचा अधिकार, पालकांचा त्यांना मोठे होताना पाहण्याचा अधिकार. हे अधिकार फक्त तुम्हाला कुत्रे आवडतात म्हणून नाहीसे होतात का? हे अधिकार तुमच्या इंस्टाग्रामवरल्या कुत्र्यांसोबतच्या फोटोपेक्षा कमी महत्त्वाचे आहेत का? सत्य हे आहे, समतोल न ठेवता केलेली दया म्हणजे अन्याय. जर तुम्हाला खरोखर कुत्रे आवडत असतील, तर त्यांना दत्तक घ्या, त्यांना खायला द्या आणि घरात त्यांचे संरक्षण करा किंवा सरकारवर तोडगा काढण्यासाठी दबाव आणा. पण, तुमच्या प्रेमाचे ओझे रस्त्यावर टाकू नका, जिथे ते दुसऱ्याच्या मुलाचा जीव घेतील. श्रीमंतांच्या भावनिक आनंदाची किंमत गरिबांनी आपल्या रक्ताने मोजू नये. ज्या समाजाला मुलाच्या जीवापेक्षा भटक्या कुत्र्याचे आयुष्य जास्त महत्त्वाचे वाटते, त्यांनी आधीच आपली माणुसकी गमावली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :राम गोपाल वर्माकुत्रा