Join us  

Raj Kundra: पोर्नोग्राफीतील मिळालेले पैसे कुणाच्या खात्यात जात होते? पोलिसांनी केलं उघड, राज कुंद्रा अडचणीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 8:22 AM

आरोपी यश ठाकूर उर्फ अरविंद कुमारविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी 

ठळक मुद्देपंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीचे संयुक्त खाते आहे.  कुंद्राच्या विविध बँक खात्याची सध्या चौकशी सुरू आहे. पीएनबी बँकेतील संयुक्त खात्यासह या बँकेत कुंद्राचे आणखी खाते आहे.संबंधित बँक खात्यांचा उपयोग हा सट्टेबाजी किंवा काळा पैसा वळवण्यासाठी करण्यात आल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी व्यवहारातून मिळणारे कोट्यवधी रुपये फरार आरोपी यश ठाकूर उर्फ अरविंद कुमार श्रीवास्तवने पत्नी आणि वडिलांच्या खात्यात ट्रान्सफर केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. गुन्हे शाखेने त्याच्या पत्नीच्या खात्यातील २ कोटी ३० लाख रुपये गोठविले आहेत.

याप्रकरणात फेब्रुवारीमध्ये सूरतमधून अटक केलेल्या तन्वीर हाश्मीच्या चौकशीतून ठाकूरचे नाव समोर आले होते. ठाकूर याचे पोर्न चित्रपटाचे शुटिंग मुंबईतील मढसह लोणावळा आणि सूरतमध्ये भाड्याने बंगले घेत सुरु होते. अशीही माहिती समजते आहे. तसेच ठाकूर हा नेहमी ऑनलाइन व्यवहार करत होता. त्यामुळे गुन्हे शाखा सध्या त्याच्याही व्यवहाराची माहिती घेत आहे. सुरूवातीला यश आणि अरविंद कुमार वेगवेगळ्या व्यक्ती असल्याचे पोलिसांना वाटले होते. पुढे तपासात अरविंद कुमार हा हाच यश ठाकूरचे नाव वापरून वावरत असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने त्याचा शोध सुरु केला. त्याच्या विरुद्ध लुक आउट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे.

याच दरम्यान ठाकूरने त्याच्या पत्नी हर्षिताच्या कानपुरमधील खात्यात कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केल्याचे समजले. त्यानुसार गुन्हे शाखेने तिच्या खात्यातील २ कोटी ३२ लाख ४५ हजार २२२ रुपये गोठविले आहेत. सहा वर्षांपूर्वी पंजाब नॅशनल बँकेत हे खाते उघडण्यात आले होते. अरविंद त्याचे वडिल नर्वदा श्रीवास्तव यांच्याही बँक खात्यात कोट्यवधी रुपये ट्रान्सफर करायचा. अरविंद अ‍ॅपमधून कमावलेले पैसे आपल्या कुटुंबियांच्या बँक खात्यात का ट्रान्सफर करायचा? याबाबत सध्या तपास सुरु आहे.

संबंधित बँक खात्यांचा उपयोग हा सट्टेबाजी किंवा काळा पैसा वळवण्यासाठी करण्यात आल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. हर्षदा आणि नर्वदा यांच्या बँक खात्यात पैसे आल्यानंतर काही दिवसांनी ते पैसे वेगळ्या खात्यात ट्रान्सफर केले जायचे. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर अरविंदच्या बँक खात्यातील १ कोटी ८१ लाख रुपये गोठविण्यात आले आहेत. अरविंद हा अमेरिकास्थित फ्लीझ मुव्हीज कंपनीचा मालक आहे. या कंपनीअंतर्गत मॉडेल्स, अभिनेत्रीकडून मालिका, वेबसिरिजच्या नावाखाली करार बनवून घेण्यात येत होते. कुंद्रा याच्या कंपनीद्वारे जे पोर्न चित्रपट तयार होत होते ते अरविंदच्या कंपनीद्वारे वेबसाइटवर अपलोड करण्यात येत असल्याचा आरोप आहे. कंपनीचे पहिले नाव न्यूफ्लिक्स होते. गुन्हे शाखेने आतापर्यंत ठाकूरच्या बँक खात्यातील साडेचार कोटी रुपये गोठविले आहेत.

मृत व्यक्तीच्या नावाचा वापरअरविंद कुमार श्रीवास्तव उर्फ यश ठाकूरने अटक टाळण्यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी २५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप केला होता. लाच द्यायला नकार दिल्याने या प्रकरणात मला अडकवण्यात आले असे त्याचे म्हणणे आहे. दरम्यान, अरविंद जे ‘यश ठाकूर’ नाव वापरायचा त्या व्यक्तीचे २०२० मध्ये इंदूरमध्ये ब्रेन ट्यमुरने निधन झाले असल्याची माहिती समोर येत आहे. 

राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीच्या खात्याचीही चौकशी

पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीचे संयुक्त खाते आहे. या खात्यातून दोघांनी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याचे समजते. पोर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित काही व्यवहार या खात्यातून झाले आहेत का? याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. कुंद्राच्या विविध बँक खात्याची सध्या चौकशी सुरू आहे. पीएनबी बँकेतील संयुक्त खात्यासह या बँकेत कुंद्राचे आणखी खाते आहे. मात्र यात, २०१६ पासून एकही व्यवहार झालेला नाही. या खात्यामध्ये आवश्यक असलेली कमीत कमी जमा रक्कमदेखील ठेवण्यात आली नव्हती.

 

टॅग्स :राज कुंद्रापोलिस