Join us  

'आम्ही वेगळे झालोय...' शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचं ट्वीट व्हायरल; नक्की प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 9:04 AM

या ट्वीटनंतर आता नेटकऱ्यांकडून अनेक अंदाज बांधले जात आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) त्याच्या नवीन सिनेमामुळे चर्चेत आहे. अडल्ट सिनेमा बनवल्याप्रकरणी राज कुंद्राला तुरुंगवास भोगावा लागला होता. जामिनावर सुटल्यानंतर आता राज कुंद्राने त्याच्या आयुष्यावरच सिनेमा काढला आहे. तसंच यामध्ये त्याने स्वत:च काम केलं आहे. आता नुकतंच राज कुंद्राच्या एका ट्वीटमुळे खळबळ माजली आहे. 

काल रात्री १ वाजता राज कुंद्राने ट्वीट करत लिहिले,'आम्ही वेगळे झालोय आणि कठीण प्रसंगी आम्हाला वेळ द्यावा अशी माझी विनंती आहे.'

या ट्वीटनंतर आता नेटकऱ्यांकडून अनेक अंदाज बांधले जात आहेत. त्याने ट्वीटमध्ये एक हार्टब्रेक इमोजीही टाकला आहे. त्यामुळे खरंच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी वेगळे होत आहेत का, त्यांचा घटस्फोट होतोय का अशा चर्चा सुरु झाल्यात. तर हा राज कुंद्राचा पब्लिसिटी स्टंट असल्याचंही बोललं जात आहे.

जामिनावर बाहेर आल्यानंतर राज कुंद्रा कायम मास्क घालूनच दिसला. त्याने कधीच आपला चेहरा दाखवला नाही. तर आता सिनेमाच्या निमित्ताने त्याने पुन्हा आपला चेहरा माध्यमांसमोर दाखवला. त्यामुळे मास्कपासून वेगळं झाल्याचंही हे ट्वीट असू शकतं असा अंदाजही नेटकऱ्यांनी लावला आहे. शिल्पा शेट्टी या संपूर्ण प्रकरणात राज कुंद्राच्या बरोबरीने उभी होती. त्यामुळे त्यांच्यात सगळं आलबेल आहे हेच दिसून येत होतं. आता या ट्वीटचा नेमका अर्थ काय आहे हे लवकरच स्पष्ट होईल. 

टॅग्स :राज कुंद्राशिल्पा शेट्टीघटस्फोटबॉलिवूड