Join us  

'आधी मारा, मग जबरदस्तीने व्हिडीओ बनवून घ्या...', माफी मागितल्यानंतर राहत फतेह अली खान पुन्हा ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 12:42 PM

राहत फतेह अली खान सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल होऊ लागले आहेत.

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राहत फतेह अली खान एका तरुणाला चप्पलने मारहाण करताना दिसत आहे. त्यांनी तरुणाला दिलेली वागणूक पाहून सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर  राहत फतेह अली खान यांनी माफीचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये हे प्रकरण उस्ताद आणि त्याच्या शागिर्दमधील असल्याचं त्यांनी म्हटलं. माफीचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर राहत फतेह अली खान सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल होऊ लागले आहेत.

नोकराला चप्पलेने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राहत फतेह अली खान यांनी सोशल मीडियावर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. एका व्हिडीओमध्ये मारहाण केलेल्या व्यक्तीचा परिचय देत तो नवीद हसनैन असल्याचं सांगितलं. तसेच संबंधित प्रकरण हे उस्ताद आणि त्याच्या शागिर्दमधील असल्याचही ते म्हणाले. शिवाय या व्हिडीओमध्ये संबंधित तरुणाचे वडिलही राहत फतेह अली खान याची बाजू घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

यानंतर त्यांनी पुन्हा दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये संबंधित तरुण या संपुर्ण प्रकरणात राहत फतेह अली खान यांची चूक नसल्याचं म्हणत आहे. तो म्हणतो, 'ते माझे उस्तादजी आहेत, त्यांच्याशी माझे अनेक वर्षांपासूनचे शिष्यत्वाचे नाते आहे. ज्यांनी हा व्हिडीओ लीक केला, त्यांचा माझ्या गुरुला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे'. तसेच मारहाण केल्यानंतर राहत यांनी माफी मागितली असल्याचे तो म्हणाला.

या संपुर्ण प्रकरणावर मात्र सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी राहत फतेह अली खान यांना ट्रोल केलं. एका युजरने लिहलं, 'लाज वाटली पाहिजे. आता तुम्ही माझे आवडते गायक राहिले नाही'. तर दुसऱ्या एका युजरने लिहलं, 'एक तर या तरुणाला धमकावलं आहे नाहीतर पैसे दिले आहेत'. आणखी एकाने लिहलं, 'आधी मारा, मग जबरदस्तीने व्हिडीओ बनवून घ्या'. तर काही नेटकऱ्यांनी 'लाज वाटली पाहिजे' अशा कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :पाकिस्तानसेलिब्रिटीबॉलिवूड