Join us

"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 16:33 IST

नुकतंच माधनवने त्याचा हा किस्सा सांगितला आहे.

अभिनेता आर माधवनचा (R Madhavan) मुलगा वेदांत (Vedant)  प्रोफेशनल जलतरणपटू आहे. त्याने  वेगवेगळ्या चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल पटकावत देशाचं नाव उंचावलं आहे.यामागे त्याची शिस्त, जिद्द, चिकाटी आणि कमालीची मेहनत आहे. वेदांतची दिनचर्या पाहून माधवन स्वत:ही चकित होतो. वेदांत ब्रह्म मुहूर्तावर उठतो तर रात्री ८ वाजता तो झोपायला जातो. नुकतंच माधनवने त्याचा हा किस्सा सांगितला आहे.

आर माधवनचा मुलगा वेदांत फक्त १९ वर्षांचा आहे. या वयात आजकाल काही मुलांनी आयुष्यात नक्की काय करायचंय हे ठरवलेलंही नसतं, तर अनेक जण पार्टी, क्लब यातच असतात.  वेदांने मात्र आपलं ध्येय ठरवलं आहे आणि तो त्या दिशेने वाटचाल करत आहे. एका मुलाखतीत आर माधवन म्हणाला, "एक प्रोफेशनल स्विमर असल्याने वेदांतचा दिवस रात्री ८ वाजताच संपतो. मग तो दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजताच उठतो. हे खरंतर सर्वात कठीण आहे. त्याच्यासाठीच नाही तर त्याच्या आईबापासाठीही(हसतच). पहाटे ४ ची वेळ ही ब्रह्म मुहूर्ताची वेळ असते. आध्यात्मिक रुपात जागं होण्याची ही अनुकूल वेळ असते."

वेदांत ६.३ फुट उंच आहे. त्याची शरीरयष्टीही जबरदस्त आहे. माधवन म्हणाला, "वेदांतसाठी जेवण करणंही व्यायामच आहे. तो फक्त खायचं म्हणून जेवायला बसत नाही तर अन्न चावणं आणि गिळणं यातल्या बॅलन्सवरही त्याला लक्ष द्यावं लागतं. इतरही गोष्टींवर त्याला लक्ष द्यायचं असतं. माझ्यातही इतकी शिस्त असती तर बरं झालं असतं. मी खरं तर खूप आळशी आहे. पण मी क्रिएटिव्ह आहे असं सांगून या गोष्टींपासून पळ काढतो."

वेदांतने मलेशियाई ओपनमध्ये ५ वेला गोल्ड मेडल जिंकलं आहे. डेनिश ओपनमध्ये गोल्ड आणि सिल्वर पटकावलं आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचं त्याचं ध्येय आहे.

टॅग्स :आर.माधवनपोहणे