Join us

​वडाली ब्रदर्समधील प्यारेलाल वडाली यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 13:10 IST

उस्ताद पूरणचंद वडाली यांचे धाकटे बंधू प्यारेलाल वडाली यांचे शुक्रवारी सकाळी वयाच्या ७५ व्या वर्षी पंजाबमधील अमृतसर येथे निधन ...

उस्ताद पूरणचंद वडाली यांचे धाकटे बंधू प्यारेलाल वडाली यांचे शुक्रवारी सकाळी वयाच्या ७५ व्या वर्षी पंजाबमधील अमृतसर येथे निधन झाले. गुरुवारी त्यांना अमृतसर येथील फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले असल्याची बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. प्यारेलाल वडाली यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. सूफी संगीत क्षेत्रात आपल्या अनोख्या गायनशैलीने वडाली ब्रदर्सने रसिकांचे मन जिंकले. त्यांची सगळीच गाणी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. या जोडीतील उत्साद प्यारेलाल वडाली यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. पूरन चंद वडाली यांचे ते छोटे भाऊ होते. पंजाबी सूफी संगीतामध्ये वडाली ब्रदर्स यांचे अतिशय मोलाचे योगदान होते. काही वर्षांपूर्वी एमटीव्ही कोक स्टुडिओमध्ये त्यांनी सादर केलेल्या तू माने या ना… या गाण्याने बरीच लोकप्रियता मिळवली होती. वडाली ब्रदर्सची हिंदी चित्रपटांमधील अनेक गाणी देखील गाजली. तनू वेड्स मनू या चित्रपटातील ए रंगरेज, आणि मौसम चित्रपटातील इक तू ही तू ही गाणी प्रेक्षकांना खूप आवडली होती. वडाली ब्रदर्स यांनी जालंधर येथील हरबल्लाह मंदिरातून आपल्या गायनाची सुरुवात केली होती. अमृतसरमधील एका छोट्या गावातून आलेले वडाली बंधू हे पंजाबी आणि सूफी गाण्यामुळे देश-विदेशात प्रसिद्ध होते. काफीया, गझल आणि भजन म्हणण्यातही वडाली बंधू पटाईत होते. त्यांच्या गायनशैलीत एक वेगळ्याच प्रकारचा साज असून हीच वेगळी शैली त्यांना या क्षेत्रात लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्यात महत्त्वाची ठरली होती. त्यांनी प्रामुख्याने बुल्ले शाह, कबीर, अमीर खुसरो आणि सूरदास यांसारख्या संतकवींच्या रचना सादर करण्याला प्राधान्य दिले होते. वडाली ब्रदर्स प्रामुख्याने काफियाँ, गझल आणि भजन या प्रकारच्या गायनासाठी ओळखले जातात. वडाली बंधूंना त्यांच्या कार्यासाठी २००५ साली पद्मश्री देऊन देखील सन्मानित करण्यात आले होते.