बोल्ड कंटेटमुळे प्रसिद्धी मिळवलेली पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नवरात्रीत दिल्लीत वर्षानुवर्षे सादर केल्या जाणाऱ्या लव-कुश रामलीला नाटकात पूनम रावणाची पत्नी मंडोदरीची भूमिका साकारणार असल्याने वाद निर्माण झाला होता. अनेकांनी याला विरोध केला होता. साधू-संत आणि विश्व हिंदू परिषदेनेही तीव्र शब्दांत याचा निषेध केला होता. पूनमला रामायणात घेण्यावरुन महाभारत झालं. पण, तरीही रामलीला कमिटीने तिला रिप्लेस करणार नसल्याचं सांगितलं आहे.
या संपूर्ण प्रकरणानंतर रामलीला कमिटीचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी भूमिका मांडली आहे. "गेल्या दोन दशकांपासून रामलीलामध्ये पंजाबी आणि बॉलिवूड कलाकार काम करत आहेत. पूनमने स्वत: आमच्याडकडे येत रामलीलाचा भाग होण्यासाठी विनंती केली होती. तिने याआधीही हिंदी आणि पंजाबी सिनेमांत काम केलं आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. कलाकार हा कलाकार असतो. त्यामुळे आम्ही तिला रिप्लेस करणार नाही. प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे", असं ते म्हणाले.
रामलीलामध्ये रावणाची पत्नी मंडोदरीची भूमिका साकारण्याबाबत पूनमने तिच्या इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांना माहिती दिली होती. तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात रामलीलासाठी उत्सुक असल्याचं तिने म्हटलं आहे. "दिल्लीतील लाल किल्ल्यावर जगभरात प्रसिद्ध असलेलं लव कुश रामलीला हे नाटक सादर केलं जातं. या नाटकात मला रावणाची पत्नी असलेल्या मंडोदरीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. मी खूप आनंदी आहे. मी पूर्ण नवरात्रीत उपवास करणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी मला बळ मिळेल. जय श्री राम", असं पूनमने व्हिडीओत म्हटलं आहे.